आळंदी: पोलीस निरीक्षकावर दगडाने हल्ल्याचा प्रयत्न; रिक्षाचालकाचा संताप सोशल मीडियावर व्हायरल वाहतूक पोलिसांशी वाद, रागाच्या भरात रिक्षाचालकाने उचलला दगड; अद्याप गुन्हा दाखल नाही
आळंदी: पोलीस निरीक्षकावर दगडाने हल्ल्याचा प्रयत्न; रिक्षाचालकाचा संताप सोशल मीडियावर व्हायरल
वाहतूक पोलिसांशी वाद, रागाच्या भरात रिक्षाचालकाने उचलला दगड; अद्याप गुन्हा दाखल नाही
आळंदी, ता. १९ जुलै – आळंदी शहरात वाहतूक पोलिसांवर रिक्षाचालकाने रागाच्या भरात दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नागरिकांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, या प्रकरणी अद्याप अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पीएमटी चौकात पुलावर एक रिक्षाचालक आपली रिक्षा थांबवून बस वळण्यासाठी अडथळा निर्माण करत होता. या संदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी रिक्षाचालकाला जागा खाली करण्याचे आदेश दिले. परंतु संबंधित चालकाने त्याचे ऐकले नाही. यावेळी दोघांत शाब्दिक वाद झाला आणि नांदुरकर यांनी रिक्षाचालकाला चापट मारली.
त्यानंतर संतप्त झालेल्या रिक्षाचालकाने रस्त्यावर पडलेला दगड उचलून पोलीस निरीक्षकांवर फेकण्याचा प्रयत्न केला. उपस्थित नागरिकांनी या घटनेचे चित्रीकरण केले असून, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे.
व्हिडिओत पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर हे रिक्षाचालकाला समजावत आहेत, तसेच त्यांनी त्याची माफीही मागितली असल्याचे स्पष्ट दिसते. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी संबंधित रिक्षा जप्त केली आहे. मात्र, कोणताही गुन्हा अद्याप दाखल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, पोलीसांवर वारंवार होणारे हल्ले आणि लोकप्रतिनिधींकडून दिले जाणारे इशारे यामुळे पोलीस दलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत