सावदा येथील ११० वर्षांची आध्यात्मिक शान – श्री स्वामीनारायण मंदिर जीर्णोद्धाराच्या नवदिशेवर! आग्रा येथील शिल्पकलेतील कुशल कारागीरांकडून कुंभ व पिलर दुरुस्तीचे कार्य सुरू
सावदा येथील ११० वर्षांची आध्यात्मिक शान – श्री स्वामीनारायण मंदिर जीर्णोद्धाराच्या नवदिशेवर!
आग्रा येथील शिल्पकलेतील कुशल कारागीरांकडून कुंभ व पिलर दुरुस्तीचे कार्य सुरू
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी सावदा:- सावदा येथील वडतालधाम संप्रदाय अंतर्गत असलेले श्री स्वामीनारायण मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून, ते सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे. सुमारे ११० वर्षांपूर्वी बांधलेले हे मंदिर, आजही अनेक भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे.
मंदिरामध्ये हरेकृष्ण महाराज व राधाकृष्ण देव यांच्या भव्य व नयनरम्य मूर्ती विराजमान आहेत. मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. पण गेल्या काही वर्षांत मंदिराच्या शिखराखालील कुंभ व पिलर (स्तंभ) पर्यावरणीय घातकतेमुळे कमकुवत होऊ लागले होते, त्यामुळे मंदिराच्या रचनेवर धोका निर्माण झाला होता.
२८ जूनपासून जीर्णोद्धाराला सुरुवात – पारंपरिक शैलीत सौंदर्याची पुनर्स्थापना
या पार्श्वभूमीवर मंदिर कोठारी यांनी शिस्तबद्ध नियोजन करून २८ जून २०२५ पासून मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याचा शुभारंभ केला. हे कार्य उत्तर प्रदेशातील आग्रा येथील पारंपरिक शिल्पकलेतील निपुण व अनुभवी कारागीरांद्वारे सुरू करण्यात आले आहे.
सध्या कुंभ आणि पिलरचे डिझाईन तयार करून, मूळ वास्तुशैलीला धरून त्यांचे संकलन व बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कारागीर मूळ सौंदर्य अबाधित ठेवत अत्यंत बारकाईने कोरीवकाम करीत आहेत, जेणेकरून मंदिराची पारंपरिक ओळख कायम राहील.
आध्यात्मिक मार्गदर्शन व व्यवस्थापन यांची सुसंवादात्मक साथ
या कार्याला वडतालधाम गादीपती पूज्य राकेशप्रसाद दासजी महाराज तसेच गुरू स्वामी धर्मप्रसादजी महाराज यांचे विशेष आशिर्वाद लाभले आहेत.
तसेच शास्त्री स्वामी भक्तीप्रकाश दासजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व भक्तिभावाने पार पडत आहे.
कोठारी स्वयंप्रकाश दासजी, शास्त्रीय धर्म किशोर ,दासजी विश्वप्रकाश दासजी, पुजारी सत्यप्रकाश दासजी आणि माधव स्वामी हे प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाच्या प्रत्येक टप्प्यावर देखरेख करीत आहेत. मंदिर ट्रस्टी मंडळही वेळोवेळी निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत आहे.
दानशूर भक्तांसाठी खुले निमंत्रण-चला,या दैवी कार्यात सहभागी होऊया!
मंदिर ट्रस्ट व समितीने सर्व हरी भक्त,भाविक, उद्योजक व ग्रामस्थांना या पवित्र कार्यात आर्थिक मदत, साहित्य सहाय्य किंवा श्रमदान करून योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
"आपली श्रद्धा केवळ शब्दांत नव्हे तर कृतीतून व्यक्त झाली पाहिजे. मंदिर उभे राहते भक्तांच्या सेवेमुळे -चला,या सेवेसाठी पुढे येऊया!"
या उपक्रमातून धर्म,सेवा आणि संस्कृतीचे संगमस्थान असलेले सावदा मंदिर नव्या रूपात अधिक तेजस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
✍ संपादकीय टिप्पणी
"मंदिरांचे जीर्णोद्धार हे फक्त दगड-मातीच्या इमारतीचे काम नसते. ते म्हणजे परंपरेचा, संस्कृतीचा आणि श्रद्धेचा पुनर्जन्म असतो. सावदा येथील स्वामीनारायण मंदिराचा हा नवा प्रवास ही केवळ वास्तुरचना नव्हे, तर भक्ती आणि समर्पणाचा नवा अध्याय आहे."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत