सावदा पालिकेच्या जॅकवेलवर दोन कंत्राटी कर्मचारी विजेच्या धक्क्याने जखमी, ठेकेदारावर कारवाईची भाजप-शिवसेना युतीची मागणी
सावदा पालिकेच्या जॅकवेलवर दोन कंत्राटी कर्मचारी विजेच्या धक्क्याने जखमी, ठेकेदारावर कारवाईची भाजप-शिवसेना युतीची मागणी
लेवा जगत न्यूज | सावदा, जळगाव जिल्हा-
सावदा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील जॅकवेलवर काम करत असलेल्या दोन कंत्राटी कर्मचार्यांना विजेचा तीव्र धक्का बसून गंभीर जखमी होण्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. या घटनेने पालिकेतील ठेकेदार व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
दुर्घटना घडली त्यावेळी कर्मचार्यांकडे कोणतेही सुरक्षा साहित्य उपलब्ध नव्हते. नियमानुसार ठेकेदाराने सुरक्षेसाठी आवश्यक उपकरणे पुरवणे बंधनकारक असतानाही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे दोन निरपराध कर्मचारी गंभीर जखमी झाले. या ठेकेदाराविरोधात यापूर्वीदेखील अनेक तक्रारी असून, त्यामध्ये कामगारांना वेळेवर पगार न देणे, भविष्य निर्वाह निधी न भरणे आणि मूलभूत सुविधा न पुरवणे यांचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना भेट देत ठेकेदारावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.
निवेदनात ठेकेदाराचे कंत्राट रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची, जखमी कर्मचार्यांच्या वैद्यकीय खर्चाची संपूर्ण रक्कम त्याच्या देयकामधून वसूल करण्याची, तसेच कर्मचारी हक्कातील थकित रक्कमाही वसूल करण्याची आणि पुढील कंत्राट केवळ नियमांची पूर्तता करणाऱ्या नव्या ठेकेदारालाच देण्यात यावे, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली.
जर यावर तात्काळ कारवाई झाली नाही, तर भाजप-शिवसेना युतीकडून तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी, भाजपचे महेश अकोले, शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी युवासेनेचे मनिष भंगाळे, माजी नगरसेविका लिना चौधरी, माजी उपनगराध्यक्ष नंदा लोखंडे, भाजपा सावदा शहर प्रमुख जिनेंद्र भारंबे नितीन सपकाळे, मंदाकिनी वारके, दीपक श्रावगे, भूषण परदेशी, निलेश खाचणे, प्रतीक भारंबे, गणेश माळी यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
ही घटना कर्मचाऱ्यांचे दैव बलवत्तर असल्याने जीवितहानी टळली, मात्र भविष्यात अशीच घटना मोठा धोका निर्माण करू शकते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सावदा पालिकेच्या कारभारात शिस्त आणि जबाबदारी येण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणी तात्काळ आणि कठोर पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी युतीकडून करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत