गोजोरा येथील दोन तरुणांचा बोलेरोच्या धडकेत दुर्दैवी अंत
भिलट बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या गोजोरा येथील दोन भाविकांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
लेवाजगत न्यूज चोपडा प्रतिनिधी-
मध्यप्रदेशातील भिलट बाबांच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघालेल्या दोन भाविकांना बोलेरो वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (२८ जुलै) सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास अडावद–चोपडा रस्त्यावर घडली. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथील रहिवासी महेंद्र शांताराम भोळे व युवराज तुकाराम तायडे हे दोघेही भिलट बाबांच्या दर्शनासाठी दुचाकीने मध्यप्रदेशात निघाले होते. दरम्यान, अडावद येथील शेतकी शाळेजवळ समोरून भरधाव आलेल्या बोलेरो वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच अडावद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांनी देखील मदतीसाठी धाव घेतली. मृतदेह तातडीने चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, गावकऱ्यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. अडावद पोलीस अधिक तपास करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत