थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याला मानाचा मुजरा – एनडीएमध्ये अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याला मानाचा मुजरा – एनडीएमध्ये अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
लेवाजगत न्यूज खडकवासला (पुणे), ता. ४ जुलै:
मराठा साम्राज्याचे पराक्रमी सेनानी आणि इतिहासातील अजेय योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आज नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (एनडीए), खडकवासला येथे करण्यात आले. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडला.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच राज्याचे विविध मंत्री, आमदार, खासदार आणि लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंह, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांचाही या कार्यक्रमात सहभाग होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाषणात बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, "छत्रपती शाहू महाराजांनी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी बाजीरावांना पेशवेपदाची सूत्रे सोपवली. त्यांनी आपल्या २० वर्षांच्या कारकीर्दीत ४१ युद्धे लढून एकही पराभव न पत्करता मराठा साम्राज्याचा विस्तार काबूलपासून बंगालपर्यंत केला." त्यांच्या 'वेग' या युद्धनीतीचे विशेष कौतुक करत फडणवीस म्हणाले, "बाजीराव पेशवे हे शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून घडलेले एक यशस्वी आणि प्रेरणादायी नेतृत्व होते."
इतिहासात काही इंग्रज आणि काही स्वकीय इतिहासकारांनी बाजीराव पेशव्यांच्या योगदानाला फारसं महत्त्व दिलं नाही, हे वास्तव असूनही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अशा थोर योद्ध्यांचा इतिहास नव्याने उजळून निघत असल्याचे त्यांनी नमूद केले. एनडीएसारख्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये उभारलेला पुतळा, सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांसाठी एक शौर्याचे आणि राष्ट्रसेवेच्या प्रेरणेचे प्रतीक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी या स्मारकाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्व संबंधितांचे आभार मानण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत