लाचखोर पोलिसांना एसीबीने रंगेहात पकडले
लाचखोर पोलिसांना एसीबीने रंगेहात पकडले
लेवा जगत न्यूज | भुसावळ प्रतिनिधी-अटक वॉरंट प्रकरणी एका आरोपीला अटक न करता वॉरंट रद्द करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मोबदल्यात २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई भुसावळ शहरातील मामा बियाणी शाळा परिसरात करण्यात आली असून, या घटनेने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराकडे अटक वॉरंट प्रकरणी मुदतवाढ देण्यासाठी संबंधित पोलिसांनी २ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात जळगाव येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून दोन्ही पोलिसांना लाच स्वीकारताना जेरबंद केले.
या घटनेमुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला तडा गेला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेलेच अधिकारी भ्रष्टाचारात गुंतले असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अटक केलेल्या दोन्ही पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत