दहीहंडी उत्सवाला गालबोट-मानखुर्दमध्ये तरुणाचा मृत्यू, मुंबई-ठाण्यात ३० जण जखमी
दहीहंडी उत्सवाला गालबोट – मानखुर्दमध्ये तरुणाचा मृत्यू, मुंबई-ठाण्यात ३० जण जखमी
लेवाजगत न्यूज मुंबई : जल्लोषात साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला यंदा गालबोट लागले. मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परिसरात दुपारी तीनच्या सुमारास बाल गोविंदांसाठी दहीहंडी बांधताना जगमोहन शिवकिरण चौधरी (वय ३२) हा तरुण पहिल्या मजल्यावरून खाली पडला. त्याला तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दुसरीकडे, मुंबई-ठाण्यासह उपनगरांमध्ये उंच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंद पथकांनी थर रचले असता अपघात झाले. थरावरून पडून एकूण ३० गोविंदा जखमी झाले असून यापैकी १५ जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे, तर उर्वरित १५ जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
मुंबई शहरात एकूण १८ जण जखमी झाले असून त्यापैकी १२ जणांवर उपचार सुरू आहेत, तर ६ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. पूर्व उपनगरात ६ जण जखमी झाले असून तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर तिघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. पश्चिम उपनगरात ६ जण जखमी झाले असून एका गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर पाच जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.
जखमी गोविंदांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. केईएम रुग्णालयात ५ जण, नायर आणि शीव रुग्णालयात प्रत्येकी १ जण, जोगेश्वरी ट्रॉमा सेंटरमध्ये ३ जण, इतर उपनगरीय रुग्णालयांमध्ये २ जण तसेच जी.टी. रुग्णालय आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयात प्रत्येकी १ जण दाखल आहेत. यापैकी दोन जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजते.
उत्सवाच्या जल्लोषात घडलेल्या या अपघातांमुळे दहीहंडी सणाला गालबोट लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत