Header Ads

Header ADS

गव्हाण गावाच्या पाणीपुरवठा समस्येवर जनआक्रोश मोर्चा प्रितम म्हात्रे यांची पोलीस आणि सिडको अधिकाऱ्यांशी यशस्वी मध्यस्ती सिडकोकडून तात्काळ पाणीपुरवठ्याचे आश्वासन

 

Public outcry over water supply problem in Gavhan village

गव्हाण गावाच्या पाणीपुरवठा समस्येवर जनआक्रोश मोर्चा
प्रितम म्हात्रे यांची पोलीस आणि सिडको अधिकाऱ्यांशी यशस्वी मध्यस्ती
सिडकोकडून तात्काळ पाणीपुरवठ्याचे आश्वासन

उरण (लेवाजगत न्यूज वार्ताहर : सुनील ठाकूर) – गव्हाण गावाला नियमित व मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी आज गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने जनआक्रोश मोर्चा काढला. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश मिळाले असून, सिडको प्रशासनाने आजपासून गावाला आवश्यक पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.

समस्या आणि पार्श्वभूमी

नवी मुंबई व उलवे नोडच्या जलद विकासाच्या प्रक्रियेत गव्हाण गाव सामील असूनही गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. गावाला दररोज सुमारे ६ लाख लिटर पाण्याची गरज असताना पाणी कमी दाबाने व अपुऱ्या प्रमाणात सोडले जात होते. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांनी मोर्चाचे आयोजन केले.

मोर्चाची सुरुवात आणि उपस्थिती

मोर्चाची सुरुवात गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयापासून झाली. ग्रामस्थांनी सिडको प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आपली मागणी जोरदारपणे मांडली. या वेळी भाजप नेते प्रितम जनार्दन म्हात्रे, माजी सरपंच भाऊशेठ पाटील, माजी उपसरपंच विजय घरत, कोळी समाज नेते विश्वनाथ कोळी, हेमंत ठाकूर, वसंत म्हात्रे, जयवंत देशमुख, देशमुख समाज अध्यक्ष किरण देशमुख, आगरी समाज अध्यक्ष अशोक कडू, योगिता भगत, हेमंत पाटील, ऋषी कोळी, राजू कोळी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थितीही विशेष उल्लेखनीय होती.


मोर्चा मार्गस्थ होण्यापूर्वीच सिडकोचे सहाय्यक अभियंता आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्री. प्रितम म्हात्रे यांनी पुढाकार घेत सखोल चर्चा केली. चर्चेनंतर सिडको प्रशासनाने गव्हाण गावाला तात्काळ आवश्यक पाणीपुरवठा सुरू करण्याचे मान्य केले. तसेच, कायमस्वरूपी तोडगा म्हणून हेटवणे पाणीपुरवठ्यातून स्वतंत्र पाईपलाईन टाकण्याच्या मागणीवर येत्या काही दिवसांत उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

तात्पुरता स्थगिती निर्णय

सिडकोकडून तातडीच्या पाणीपुरवठ्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आणि पुढील चर्चेची खात्री दिल्यानंतर ग्रामस्थांनी मोर्चा तात्पुरता स्थगित केला.


"गव्हाण गावासाठी हेटवणे पाणीपुरवठ्यातून स्वतंत्र नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी आमच्या ग्रामस्थांची आहे. या संदर्भात लवकरच सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. तोपर्यंत गावाला मुबलक प्रमाणात आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे हमीपत्र आम्हाला सिडको प्रशासनाने दिले आहे."
प्रितम जनार्दन म्हात्रे, मा. विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.