“घरदार सोडलं, सुपीक जमीन दिली; आता विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव द्या” – प्रकल्पग्रस्तांची सरकारकडे हाक
“घरदार सोडलं, सुपीक जमीन दिली; आता विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव द्या” – प्रकल्पग्रस्तांची सरकारकडे हाक
लेवाजगत न्यूज उरण – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ३० सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार युद्धपातळीवर काम करत असताना प्रकल्पग्रस्त मात्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. रविवारी प्रकल्पग्रस्त तरुणांनी पळस्पे ते जेएनपीटी मार्गावरील नांदगाव टेकडीवर चढाई करून सरकारला अनोख्या पद्धतीने हाक दिली. “घरदार सोडलं, सुपीक जमीन दिली, आता विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव द्या,” अशी ठाम मागणी यावेळी प्रकल्पग्रस्तांनी केली.
या आंदोलनाचे नेतृत्व प्रकल्पग्रस्त विजय शांताई नामदेव शिरढोणकर यांनी केले. त्यांनी सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या. त्यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ज्यांची जमीन संपादित झाली आहे त्या कुटुंबियांना विमानतळ प्रकल्पात रोजगार द्यावा आणि पुनर्वसन पॅकेजबाबत दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत या मागण्या प्रमुख आहेत.
या आंदोलनाला दहा गाव समितीसह विविध राजकीय पक्षांनीही पाठिंबा दर्शवला. परिसरातील शेकडो भूमिपुत्रांनी डोंगरावर चढून सामूहिकरित्या सरकारकडे आपला आवाज पोहोचवला. प्रकल्पग्रस्त विजय शिरढोणकर, सचिन केणी, ऍड. विक्रांत घरत, राहुल मोकळ, प्रदीप म्हात्रे, मोहन घरत, कवी तारेकर, सुहास पाटील, पुंडलिक म्हात्रे, ऍड. प्रशांत भोईर, सुनील म्हात्रे, बाळा नाईक (सरपंच), महेंद्र नाईक, प्रकाश नाईक, संदीप नाईक यांच्यासह परिसरातील हजारो ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.
प्रकल्पग्रस्तांचा ठाम इशारा आहे की त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत