गोरक्षक नव्हे तर खंडणीखोर गोभक्षकांशी लढणार; माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा इशारा
गोरक्षक नव्हे तर खंडणीखोर गोभक्षकांशी लढणार; माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा इशारा
वृत्तसंस्था कोल्हापूर – राज्य शासनाचा गोवंश हत्या बंदी कायदा हा प्रत्यक्षात गोपालक हत्या कायदा ठरला असून त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत, अशी टीका माजी कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी सोमवारी केली. गोरक्षक नव्हे तर खंडणीखोर आणि गोरखधंदा करणाऱ्या गोभक्षकांशी नांगराचा फाळ हातात घेऊन लढण्याचा सणसणीत इशाराही त्यांनी दिला.
खोत म्हणाले की, आज शेतकऱ्यांसमोर भाकड गाई व कमी दूध देणाऱ्या जर्सी गाई यांचे पालनपोषण करणे मोठा प्रश्न ठरला आहे. अशा जनावरांवर खर्च करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. एका शेतकऱ्याकडे दोन जनावरे असली आणि त्यामध्ये एखादे भाकड निघाले तर त्याचा सांभाळ करणे शक्य होत नाही. शिवाय जनावर आजारी पडले तरी उपचारांचा उपयोग होत नाही. एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा धंदा करतो आणि त्यावर अनुत्पादक जनावरे भार ठरतात. त्यामुळे दूध व्यवसाय तोट्याचा बनला आहे.
पूर्वी शेतकरी भाकड जनावरे विकत असताना त्याला २० ते २५ हजार रुपये मिळत. या रकमेबरोबर आणखी काही पैसे घालून शेतकरी नवीन जनावर विकत घेऊ शकत होता. मात्र आज गोरक्षकांच्या नावाखाली उभ्या राहिलेल्या गोरखधंद्यामुळे शेतकऱ्यांना जनावरे विकणेही कठीण झाले आहे. रस्तोरस्ती अडवून खंडणी गोळा केली जाते. परिणामी गावोगावच्या शेतकऱ्यांचे हाल होत असून शेती संकटात सापडली आहे. “हे गोरक्षक नव्हेत तर गोभक्षक झाले आहेत,” असा आरोप खोत यांनी यावेळी केला.
खोत पुढे म्हणाले की, आता हा प्रश्न शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा असून त्यांच्या घामाच्या किमतीचा आहे. त्यामुळे आम्ही नांगराचा फाळ हातात घेऊन या खंडणीखोर गोरक्षकांचा बंदोबस्त करू. शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले असून शेती अडचणीत आली आहे. या परिस्थितीची जबाबदारी राज्य शासनावर असल्याचे सांगून खोत यांनी सरकारला घरचा आहेर दिला.
यावेळी सदाभाऊ खोत यांनी गोवंश कायद्यामुळे शेतकऱ्यांना सोसाव्या लागणाऱ्या अडचणींचा सविस्तर उहापोह केला आणि हा कायदा शेतकऱ्यांसाठी घातक ठरत असल्याचा आरोप करत सरकारने आता वास्तववादी भूमिका घ्यावी, अन्यथा संघर्ष टाळता येणार नाही, असा इशाराही दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत