भारतीय जवानांसाठी सावदा येथील विद्यार्थिनींकडून स्वहस्ते तयार राख्या पाठविण्याचा उपक्रम
भारतीय जवानांसाठी सावदा येथील विद्यार्थिनींकडून स्वहस्ते तयार राख्या पाठविण्याचा उपक्रम
लेवाजगत न्यूज सावदा – डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल, सावदा येथील स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थिनींकडून भारतीय जवानांसाठी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. रक्षाबंधन या सणाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांशी भावनिक नातं जोडण्यासाठी आणि त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापिका भारती महाजन, स्काऊट प्रशिक्षक प्रशांत सोनवणे तसेच गाईड प्रशिक्षिका कल्पना वाणी यांनी केले. विद्यार्थिनींनी देशभक्तीची भावना मनात ठेवून सुंदर, आकर्षक आणि हस्तनिर्मित राख्या तयार केल्या. या राख्या सैनिकांना पाठविताना त्यांच्याप्रती आदर, प्रेम आणि भावनिक जिव्हाळा व्यक्त करण्यात आला.
राख्या सुपूर्द करण्यासाठी स्काऊट प्रशिक्षक प्रशांत सोनवणे आणि खिरोदा येथील माजी सैनिक बी. ए. सोनवणे यांनी लेफ्ट कर्नल श्रीवास्तव आणि कंपनी, आर. पी. डी. भुसावळ कॅम्प येथे भेट दिली. तेथे सैनिकांना राख्या देण्यात आल्या व त्यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा पोहचविण्यात आल्या.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत करणारा ठरला असून, सैनिकांसाठी हा हावभाव भावनिक व प्रेरणादायी ठरला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत