मानखुर्द बालगृहात शिव श्रमिक कामगार संघटनेचा चॉकलेट दहीहंडी उत्सव
मानखुर्द बालगृहात शिव श्रमिक कामगार संघटनेचा चॉकलेट दहीहंडी उत्सव
लेवाजगत न्यूज मुंबई – मानखुर्द येथील नवीन व अतिरिक्त बालगृहात शिव श्रमिक कामगार संघटनेतर्फे १६ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता चॉकलेट दहीहंडीचा आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात सुमारे ७५ अनाथ बालक सहभागी झाले.
या उत्सवाचा उद्देश बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांची ओळख करून देणे आणि त्यांच्या आयुष्यात आनंद, ऊर्जा व प्रेमाचे क्षण निर्माण करणे हा होता. चॉकलेट हंडी फोडतांना बालकांनी मनसोक्त आनंद लुटला. चॉकलेट्सची लयलूट, गाण्यांच्या तालावर नाच व मिष्टान्नासह अल्पोपहाराचे वाटप यामुळे बालकांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष राऊळ यांनी बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच खरे समाधान असल्याचे सांगितले, तर सचिव संदीप शुक्ला यांनी यापुढेही समाजातील उपेक्षित घटकांसाठी सेवा कार्य सुरू राहील असे नमूद केले. कार्याध्यक्ष अनुज केसरकर, विकास माळी, विक्रम चव्हाण, प्रदीप गावडे, छोटू शर्मा आणि विक्रम कांबळे आदी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
गुंजन ऑर्केस्ट्राने सुमधुर गीतांचे सादरीकरण करून वातावरण रंगतदार केले. यासाठी संचालक राज नाखवा यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच बालगृहातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल संघटनेने कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यात रवी सिंह (माजी शाखाप्रमुख, शिवसेना शिंदे गट), ऍड. महेंद्र भिंगारदिवे (वकील व समाजसेवक), जे. पी. अग्रवाल (समाजसेवक), राजू नगराळे (समाजसेवक), जितेश काटकर (उपाध्यक्ष, दक्षिण मध्य मुंबई भाजपा), मनोज सिंह (ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष, युवा मोर्चा समाजवादी पार्टी), अंकित सिंह (वॉर्ड अध्यक्ष, भाजपा), राकेश तळगावकर (कामाक्षी क्रिएटिव्ह संचालक तसेच राज्य सांस्कृतिक समन्वयक), राज पांडे (संपादक, CEN न्यूज), महेश फोंडके, शमशाद भाई, गुरुदत्त वाकदेकर आदींचा समावेश होता.
एका बाजूला उत्सवांच्या नावाखाली व्यावसायिकीकरण व संस्कृतीचे विद्रुपीकरण होत असताना, अनाथ बालकांसोबत असा अनोखा उत्सव साजरा करून शिव श्रमिक कामगार संघटनेने समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. त्यामुळे या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत असून तो आगामी सामाजिक कार्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत