Contact Banner

सावदा येथे बैठकीत लेवा पाटीदार समाज विवाह सुधारणेसाठी पुढे सरसावला; आदर्श आचारसंहितेच्या २७ नियमांवर सखोल मंथन

आदर्श आचारसंहितेच्या २७ नियमांवर सखोल मंथन



सावदा येथे बैठकीत लेवा पाटीदार समाज विवाह सुधारनेसाठी पुढे सरसावला; आदर्श आचारसंहितेच्या २७ नियमांवर सखोल मंथन

लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी):  लेवा पाटीदार समाजात विवाहप्रसंगी वाढता खर्च, दिखावा आणि परंपरेशी विसंगत ठरणाऱ्या प्रथा दूर करून साधेपणाला व पारंपरिकतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या वतीने गुरुवार, ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सावदा येथे डॉ.व्ही. जे. वारके यांच्या सुश्रुत हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये विशेष बैठक आयोजित करण्यात आली.







या बैठकीत विवाहविषयक आदर्श आचारसंहितेच्या २७ नियमांवर सखोल चर्चा होऊन समाजहितासाठी त्यांची अंमलबजावणी कशी करावी यावर ठोस निर्णय घेण्यात आले. या बैठकीस महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अरुण बोरोले, साहित्यिक प्रा व. पू. होले, पुणे पिंपरी चिंचवड येथील भ्रातृ मंडळाचे पदाधिकारी कृष्णाजी खडसे, दिलीप चौधरी, माजी नगरसेवक अजय भारंबे, संपादक श्याम पाटील, फैजपूर येथील सातपुडा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन नरेंद्र नारखेडे, मस्कावद येथील शिक्षक प्रवीण वारके, उधळी येथील प्रगतिशील शेतकरी ललित पाटील, अनिल नेमाडे, योगेश्वर महाजन, ज्योती पाटील, योगिनी पाटील, नलिनी बेंडाळे, हर्षल जावळे, जयेश पाटील, ईशान पाटील, तुषार पाटील, अशोक चौधरी, संदीप महाजन, संतोष पाटील, विजय वारके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन नंदकुमार पाटील यांनी केले.

संहितेमध्ये विवाहात फुगे, फटाके, डीजे आणि धुरांडे टाळण्यावर भर देण्यात आला असून त्याऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, वरातीत नाचगाणे व मद्यपान थांबवावे आणि मुहूर्तावरच लग्न लागावे, असे स्पष्ट करण्यात आले. स्टेजवरच अक्षता टाकणे, वर-वधूला उचलण्यास बंदी, फक्त पाच पदार्थांचे स्नेहभोजन, पाहुण्यांची संख्या ५०० मर्यादेत ठेवणे यांसारखे मुद्देही ठळकपणे अधोरेखित करण्यात आले.

नव्या खर्चिक प्रथा जसे की प्री-वेडिंग शूट्स, हळदी व लग्न एकत्र ठेवणे, साखरपुडा १०० लोकांच्या उपस्थितीत घरच्या घरी करणे, आमंत्रणपत्रिका सोशल मीडियावरून पाठवणे, आहेर व हुंडा बंद करणे अशा सुधारणा सुचवण्यात आल्या.

तसेच, विवाहात पारंपरिक वेशभूषेवर भर, केक कापण्यास बंदी, ‘रुखवत’ बंद करणे, मांडव चुकता प्रथेमार्फत समाजोपयोगी संस्थांना देणगी देणे, मंगळसूत्र कायम गळ्यात ठेवणे, वधू-वर व पालकांची वैद्यकीय तपासणी व समुपदेशन अनिवार्य करणे असेही महत्त्वाचे नियम प्रस्तावित झाले.

या नियमांचे पालन करणाऱ्या कुटुंबांचा महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात येईल, तर संहितेचे पालन न करणाऱ्या विवाह प्रसंगी उपस्थित समाजबांधवांनी शांततेत निघून जावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक गावातून १०–१५ युवकांची टीम तयार करून समाजप्रबोधन व अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

बैठकीच्या अखेरीस, समाजातील प्रत्येक सदस्याने संहितेवरील आपली मते लेखी स्वरूपात द्यावीत, त्यानंतर अंतिम संहितेचे स्वरूप निश्चित करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.

समाजातील विवाहप्रसंगी साधेपणा आणि संस्कृतीचा वारसा टिकवण्यासाठी ठरवलेली ही आदर्श संहिता केवळ कागदावर न राहता, तिची अंमलबजावणी प्रत्यक्षात होणे आवश्यक आहे. यासाठी लेवा समाजबांधवांनी पुढाकार घेऊन ही संहिता समाजात – विशेषतः ग्रामीण व तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.