एमआयडीसी परिसरातील ‘हॉटेल तारा’वर पोलिसांचा छापा; तीन महिलांची सुटका
एमआयडीसी परिसरातील ‘हॉटेल तारा’वर पोलिसांचा छापा; तीन महिलांची सुटका
जळगाव : प्रतिनिधी-शहरातील एमआयडीसी परिसरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच बुधवारी सायंकाळी पोलिसांनी सापळा रचून मोठी कारवाई केली. एच सेक्टरमधील ‘हॉटेल तारा’ येथे धाड टाकण्यात आली असून, या कारवाईदरम्यान तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. हॉटेलचा मालक आणि दोन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सविस्तर वृत्तानुसार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार मानव तस्करी प्रतिबंधक पथकाने (AHTU) ही कारवाई केली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खोलीतील हालचालींवर लक्ष ठेवले. निश्चित सिग्नलप्रमाणे खोलीतील लाईट दोनदा बंद-चालू केल्यानंतर तत्काळ छापा टाकण्यात आला. त्यावेळी तिथून तीन महिलांची मुक्तता करण्यात आली.
पीडित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यासाठी समुपदेशनाची प्रक्रिया सुरू केली आहे. हॉटेल मालक आणि ग्राहकांची चौकशी सुरू असून, या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का याचाही तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत व गृह उपअधीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात प्रभारी अधिकारी योगिता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर, सहाय्यक फौजदार संजय हिवरकर, विठ्ठल फुसे, रवींद्र गायकवाड, निलिमा सुशीर, हवालदार दीपक पाटील, भूषण कोल्हे, मनीषा पाटील व वाहिदा तडवी यांचा समावेश होता.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. शहरातील अशा अनैतिक कारवायांवर पोलिसांनी केलेली निर्णायक कारवाई नागरिकांमध्ये कौतुकास्पद ठरत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत