Contact Banner

रावेर येथून जळगावकडे जाणाऱ्या-येणाऱ्या काही बस भुसावळ बायपास मार्गे धावणार

Some buses going from Raver to Jalgaon will run via Bhusawal bypass.


रावेर येथून जळगावकडे जाणाऱ्या-येणाऱ्या काही बस भुसावळ बायपास मार्गे धावणार 

लेवाजगत न्यूज, भुसावळ (प्रतिनिधी):भुसावळ शहरातील रेल्वेच्या लोखंडी पुलापासून ते बस स्थानकापर्यंतच्या अमर स्टोअर मार्गे जाणाऱ्या रस्त्याचे सध्या काँक्रीटीकरण सुरू असून, त्यामुळे शहरातील वाहतूक मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या कामामुळे भुसावळ शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या काही एस.टी. बससेवा थेट वरणगाव चौफुल्ली मार्गे वळविण्यात आल्या आहेत.

रावेरहून निघणाऱ्या जळगावकडे जाणाऱ्या  येणाऱ्या काही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आता विवरा–सावदा–फैजपूर मार्गे थेट भुसावळ बायपासने धावतील. त्यामुळे या बसेस भुसावळ बस स्थानकावर जाणार नाही. या निर्णयामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, अधिक जलद व अडथळामुक्त प्रवास शक्य होणार आहे.

या बदलाचा प्रभाव सकाळच्या फेऱ्यांवर अधिक जाणवतो.  त्यासाठी रावेर येथून सकाळी १०:१५, ११:००, ११:३० व १२:०० वाजता रावेरहून जळगावकडे जाणाऱ्या एस.टी. बसेस थेट भुसावळ बायपास मार्गे धावतील. याशिवाय लांब व मध्यम पल्ल्याच्या सर्वसाधारण बसेसही  भुसावळ बायपास मार्गे सोडण्यात येत आहेत.

तथापि, छत्रपती संभाजीनगर  कडे जाणाऱ्या बसेस मात्र पूर्वीप्रमाणेच भुसावळ बस स्थानकावरून ये जा करतील असे रावेर आगार प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या मार्गावरील बदलामुळे प्रवाशांना शहरातील वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ येणार नाही. यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार असून, प्रवाशांनी या पर्यायी मार्गाचा लाभ घ्यावा व आपला वेळ वाचवावा, असे आवाहन रावेर आगार प्रमुखांनी केले आहे.

या तात्पुरत्या व्यवस्था रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत लागू राहतील. दरम्यान, प्रवाशांनी अधिक माहिती आणि अचूक वेळापत्रकासाठी जवळच्या आगारात चौकशी करावी, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.