यावल शहरातून बेपत्ता झालेल्या ६ वर्षीय बालकाचा मृतदेह शेजाऱ्याच्या घरात; शहरात तणावाचे वातावरण
यावल शहरातून बेपत्ता झालेल्या ६ वर्षीय बालकाचा मृतदेह शेजाऱ्याच्या घरात; शहरात तणावाचे वातावरण
यावल (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : यावल शहरातील बाबुजीपुरा परिसरात शुक्रवारी संध्याकाळपासून बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह शनिवारी सकाळी शेजाऱ्याच्या घरात मिळून आल्याने शहरात खळबळ उडाली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून मारेकऱ्याच्या दुकानावर संतप्त जमावाने दगडफेक केली. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली असून दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.
माहितीनुसार, मो. हन्नान खान मजीद खान (वय ६) हा शुक्रवारी (दि. ५ सप्टेंबर) संध्याकाळी सहा वाजता हरवला होता. नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो मिळून आला नव्हता. शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजता शेजारील घराच्या यांच्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावरील कोठीत त्याचा मृतदेह मिळून आला.
या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच बाबुजीपुरा भागात नागरिकांची प्रचंड गर्दी जमली. जमावास शांत करण्यासाठी हाजी शब्बीर खान, डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, शरद कोळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन, एम. जे. शेख तसेच मुस्लिम समाजातील मान्यवरांनी प्रयत्न केले. तरीही संतापलेल्या जमावाने बारी चौकातील दुकानावर दगडफेक केली.
दरम्यान, शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली असून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून दंगा नियंत्रण पथक पाचारण केले आहे. तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. शहरात तणावाचे वातावरण असून बाबुजीपुरा भागात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत