Contact Banner

लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागर तर्फे आर्थिक दुर्बल मुलांना शैक्षणिक सहाय्य

Educational assistance to economically weak children by Leva-Bhratrumandal-Pimpale-Saudagar

लेवाजगत न्यूज


लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागर तर्फे आर्थिक दुर्बल मुलांना शैक्षणिक सहाय्य

अमेरिकेतील समाजबांधवांचे उदार योगदान; ३ विद्यार्थ्यांना वार्षिक १.११ लाख रुपयांची मदत

लेवा जगत न्यूज पुणे (दि. १७ सप्टेंबर २०२५) :-समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांचे उच्च शिक्षण थांबू नये, यासाठी लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे सौदागर, पुणे यांनी पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या अलीकडील सभेत (दि. १६ सप्टेंबर) विशेष शैक्षणिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली असून यावर्षी एकूण तीन विद्यार्थ्यांना वार्षिक मिळून १.११ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

या योजनेत कुमार रीपुंजय योगेश धांडे (रोझोदे) याला जळगाव येथील केसीई कॉलेजमध्ये डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी पुढील तीन वर्षे दरवर्षी २० हजार रुपये मदत मिळणार आहे. कुमार नीरज प्रमोद बढे (मस्कावद) याला आयएमआर कॉलेज, जळगाव येथे बीसीए शिक्षणासाठी पुढील तीन वर्षे दरवर्षी २० हजार रुपये मिळणार आहेत. तर कुमार केतन मुरलीधर टोंगळे (खिर्डी) याला नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट, तळेगाव (पुणे) येथे कंप्युटर इंजिनिअरिंग शिक्षणासाठी पुढील चार वर्षे प्रतिवर्षी ७१ हजार रुपये सहाय्य मंजूर झाले आहे.

या उदात्त कार्यासाठी लागणारा निधी अमेरिकेत कार्यरत असलेल्या “लेवा कट्टा युएसए” या सामाजिक व्यासपीठाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. त्यासाठी श्री नितीन मुरलीधर नारखेडे यांनी विशेष समन्वय साधला. याशिवाय श्री मनीष खर्चे, श्री राजेश भारंबे, श्री प्रवीण भोळे, श्री निवृत्ती बऱ्हाटे, श्री अनंत पाटील, श्री सुहास महाजन, श्री राहुल महाजन, श्री कमलेश महाजन, श्री ललित नारखेडे, श्री रवींद्र भंगाळे, श्री हर्शल नेहेते, श्री सुनील नारखेडे, योगेश्वर अत्तरदे व श्री दीपक पाटील यांचेही महत्त्वाचे योगदान आहे.

दरम्यान, या शैक्षणिक योजनेसाठी एकूण नऊ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. यासाठी वार्षिक साधारण ९.५ लाख रुपयांची आवश्यकता होती. मात्र उपलब्ध निधीअभावी केवळ तीन विद्यार्थ्यांनाच मदत करता आली. तरीही समाजातील दानशूर बांधवांच्या सहकार्याने पुढील काळात अधिकाधिक मुलांना सहाय्य करण्याचा निर्धार मंडळाने व्यक्त केला आहे.

या अनुषंगाने मंडळाचे अध्यक्ष विकास लीलाधर वारके यांनी समाजबांधवांना आवाहन करताना सांगितले की, “आपल्या समाजातील कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण पैशाअभावी थांबू नये. यासाठी सर्वांनी उदार हस्ते देणग्या द्याव्यात. वाढदिवस, लग्नसमारंभ वा इतर कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी शैक्षणिक निधीसाठी मदत करावी.”

अधिक माहितीसाठी संपर्क : ७८२२०४९४२३ / ९५९५४०६५१६ / ८७८८०१३५८०.

लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे सौदागर हे समाजोपयोगी विविध उपक्रम राबवित आहे. त्यामध्ये – सवलतीच्या दरात विमा कवच उपलब्ध करून देणे, ग्रामीण शाळांमध्ये पौगंडावस्थेतील मुली व त्यांच्या मातांसाठी मार्गदर्शन, शेतकऱ्यांसाठी शेत सुरक्षा व पीक व्यवस्थापन अॅप विकसित करणे, तसेच लेवा संस्कृतीची माहिती देणारी दिनदर्शिका प्रकाशित करण्याचे काम सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.