"I love Muhammad" लिहिल्याबद्दल एफआयआर : सावदा मुस्लिम समाजाचा संताप
"I love Muhammad" लिहिल्याबद्दल एफआयआर : सावदा मुस्लिम समाजाचा संताप
राष्ट्रपती व पंतप्रधानांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
लेवाजगत न्यूज सावदा-दि. 19 सप्टेंबर 2025, शुक्रवार रोजी सावदा येथील मुस्लिम समाजाने उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सावदा पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. केवळ “I love Muhammad” असे लिहिल्यामुळे तेथील 25 मुस्लिम तरुणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याने सावदा परिसरातील मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप उसळला असून या कारवाईला भारतीय संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्यावर सरळसरळ गदा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
समाजाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “I love Muhammad” लिहिणे हे श्रद्धा, प्रेम आणि भक्तीचे प्रतीक आहे. यात कोणत्याही धर्माचा अपमान होत नाही. अशा अभिव्यक्तीला गुन्हा ठरवणे म्हणजे लोकशाहीची थट्टा व संविधानाच्या मुलभूत तत्त्वांवर आघात होय. समाजाने संविधानातील कलम 19(1)(अ) मधील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 25 मधील धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आणि कलम 21 मधील जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याची हमी यांचा आधार घेत आपली भूमिका ठामपणे मांडली.
सावदा मुस्लिम समाजाने आपल्या मागण्याही स्पष्ट केल्या आहेत. त्यामध्ये – कानपूर येथील 25 निष्पाप तरुणांवर दाखल करण्यात आलेले एफआयआर तात्काळ रद्द करण्यात यावे, भविष्यात कोणत्याही समुदायाच्या धार्मिक भावना आणि अभिव्यक्तींवर अशी असंवैधानिक कारवाई होऊ नये, तसेच देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानानुरूप समानता आणि धार्मिक स्वातंत्र्याची हमी मिळावी या मागण्या प्रमुख आहेत. समाजाने असेही स्पष्ट केले की, जर सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून निष्पाप तरुणांना न्याय दिला नाही, तर हे लोकशाही आणि संविधानाच्या प्रतिष्ठेवर कलंक ठरेल. “आम्ही न्याय, समानता आणि बंधुत्वासाठी कटिबद्ध आहोत” अशी ठाम भूमिका या निवेदनात घेण्यात आली.
यावेळी शेखपुरा मुस्लिम पंच सचिव शेख मुख्तार शेख अरमान यांनी सांगितले की, धार्मिक भावनांचा आदर करणे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी देणे हे लोकशाहीचे मूळ आधारस्तंभ आहेत. त्यामुळे सरकारने त्वरित हस्तक्षेप करून या प्रकरणी न्याय दिला पाहिजे.
सावदा पोलीस ठाण्यात हे निवेदन मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना सादर करण्यात आले. या वेळी मुस्लिम समाजातील मोहम्मद उमेर खान, शेख अरबाज, अबु दानिश, दानिश खान, आबिद शेख नजीर, मकसूद खान मुस्तफा खान, हाजी जाविद कारी, शेख राजा शेख सादीक, शेख निसार शेख नबी, शेख इरफान शेख लुकमान, शेख आबिद शेख मजीद, मोईन लाला, शेख अजहर शेख कमील, माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांच्यासह असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
या संपूर्ण आंदोलनातून सावदा मुस्लिम समाजाने स्पष्ट संदेश दिला की, धार्मिक भावना व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही आणि न्याय मिळवण्यासाठी संविधानिक मार्गांचा अवलंब करून लढा दिला जाईल.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत