सहल प्रकरणाचे पडसाद : भुसावळ येथे सेंट अॅलॉयसिस स्कूलवर उद्या हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा
सहल प्रकरणाचे पडसाद : भुसावळ येथे सेंट अॅलॉयसिस स्कूलवर उद्या हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा
लेवाजगत न्यूज भुसावळ : शहरातील सेंट अॅलॉयसिस हायस्कूलने आयोजित केलेल्या सहलीत विद्यार्थिनींना चेहऱ्यावर स्कार्फ बांधून एका धार्मिक स्थळी नेल्याच्या प्रकरणाने वाद पेटला आहे. याप्रकरणी भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी (दि. १६ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता शाळेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. भाजप पदाधिकाऱ्यांनी रविवारी मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
प्रकरणाची माहिती
सेंट अॅलॉयसिस शाळेतील स्काउट-गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी ११ सप्टेंबर रोजी धार्मिक सलोखा सहल काढण्यात आली होती. या सहलीदरम्यान विद्यार्थिनींना एका धार्मिक स्थळी नेण्यापूर्वी चेहऱ्यावर स्कार्फ बांधायला लावल्याचा आरोप पालक व हिंदुत्ववादी संघटनांनी केला. त्यामुळे शनिवारी शाळेत धडक देऊन त्यांनी शाळेकडून जाब विचारला होता.
भाजपची भूमिका
रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद सावकारे, माजी शहराध्यक्ष युवराज लोणारी, दक्षिण विभाग शहराध्यक्ष किरण कोलते, उत्तर विभाग शहराध्यक्ष संदीप सुरवाडे यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर, प्रा. दिनेश राठी, प्रकाश बतरा, राजेंद्र आवटे, गिरीश महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
हिंदू समाजाचे निवेदन
शनिवारी रात्री श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात झालेल्या बैठकीत सकल हिंदू समाजाने निर्णय घेतला की मंगळवारी सकाळी १० वाजता महाराणा प्रताप चौकात एकत्र येऊन प्रांत व गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. यामध्ये उच्चस्तरीय चौकशी करून शाळेवर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.
शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार
सदर प्रकरणात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. मुलींना स्कार्फ बांधून प्रार्थनास्थळी का नेले? यामागे कोण सूत्रधार आहे? याचा तपास करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीवर भुसे यांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघटनांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत