"शिक्षण, संस्कार आणि करिअर संधींचे दालन – जे.टी. महाजन इंजिनीअरिंग कॉलेजचा इंडक्शन प्रोग्राम"
"शिक्षण, संस्कार आणि करिअर संधींचे दालन – जे.टी. महाजन इंजिनीअरिंग कॉलेजचा इंडक्शन प्रोग्राम"
लेवाजगत न्यूज फैजपूर (ता. यावल) : येथील जे.टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम मोठ्या उत्साहात व शैक्षणिक वातावरणात संपन्न झाला. महाविद्यालयीन जीवनाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने व्हावी, विद्यार्थ्यांना संस्थेतील वातावरण, नियम, सुविधा यांची माहिती मिळावी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद निर्माण व्हावा तसेच त्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात संस्थेतील विविध सोयीसुविधा, अभियांत्रिकीच्या शाखा व त्यांचे परस्परसंबंध, व्यक्तिमत्व विकास, योगा व प्राणायामाचे महत्त्व व त्याचे प्रात्यक्षिक, संगणकीय सुविधा व त्यांचा अभ्यासातील उपयोग, अभ्यासक्रमाची रचना, पदवी अभ्यासक्रमानंतर करिअरच्या संधी, यशस्वी विद्यार्थ्यांशी संवाद अशा विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. के.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. जी.ई. चौधरी, विभागप्रमुख डॉ. डी.ए. वारके, प्रा. डी.आर. पाचपांडे, डॉ. पी.एम. महाजन उपस्थित होते. प्रा. सेजल पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना केली. यावेळी विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर को-करिक्युलर व एक्सट्रा-करिक्युलर उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेतल्यास उत्तमोत्तर प्रगती साधता येईल, असे मार्गदर्शन करण्यात आले.
प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. एम.डी. पाटील यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रगतीचा आलेख विद्यार्थ्यांसमोर सादर केला. त्यांनी महाविद्यालयातील प्रत्येक विभाग, प्रयोगशाळा, अत्याधुनिक उपकरणे व सोयीसुविधांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच विविध विभाग प्रमुख व प्राध्यापकांची विद्यार्थ्यांशी ओळख करून देण्यात आली. नवीन शैक्षणिक प्रणालीनुसार बी.टेक. प्रथम वर्ष अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीचे तपशीलवार स्पष्टीकरणही करण्यात आले.
इंडक्शन प्रोग्रामच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात प्रा. कॅप्टन डॉ. आर.आर. राजपूत (धनाजी नाना महाविद्यालय) यांनी "व्यक्तिमत्व विकास, नेतृत्वगुण आणि ध्येयनिश्चिती" या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. के.जी. पाटील यांनी "इंग्रजी भाषेचे महत्त्व व दैनंदिन जीवनातील उपयोग" या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्याख्यान दिले.
दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात कथाकथनकार प्रा. व.पु. होले यांनी विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक यशच नव्हे तर सामाजिक जीवनात यशस्वी होण्यासाठी जबाबदारीचे भान ठेवण्याचे मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पी.एम. महाजन यांनी स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षांसाठी उपयुक्त टिप्स व तंत्रे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतरच्या सत्रात उपप्राचार्य डॉ. जी.ई. चौधरी यांनी "प्रथम वर्षापासूनच प्लेसमेंटसाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची गरज" या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. एम.डी. पाटील, प्रा. व्ही.व्ही. महाजन, प्रा. सेजल पाटील, प्रा. प्रतीक्षा पाटील यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास शेठ चौधरी व मार्तंड भिरूड, सचिव विजय झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य डॉ. के.जी. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी.ई. चौधरी व सर्व विभाग प्रमुखांच्या सहकार्याने हा इंडक्शन प्रोग्राम यशस्वीरीत्या पार पडला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत