रावेर मतदारसंघातील एकही नागरिक आयुष्मान कार्डाविना राहता कामा नये – आमदार अमोल जावळे
रावेर मतदारसंघातील एकही नागरिक आयुष्मान कार्डाविना राहता कामा नये – आमदार अमोल जावळे
लेवा जगत न्यूज रावेर : “माझ्या मतदारसंघातील एकही नागरिक आयुष्मान भारत कार्डाविना राहू नये, जे पाणंद रस्ते नकाशावर दाखल नाहीत त्यांचे मॅपिंग करून क्रमांक देण्यात यावेत आणि घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी. या तिन्ही बाबी मिशन मोडमध्ये पूर्ण व्हाव्यात,” असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल जावळे यांनी दिले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (१७ सप्टेंबर) आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त (२ ऑक्टोबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून राज्यभर “सेवा पंधरवडा” उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने फैजपूर येथील विभागीय कार्यालयात सोमवारी विशेष बैठक आयोजित करण्यात आली, त्यावेळी आमदार जावळे बोलत होते.
पाणंद रस्त्यांचे मॅपिंग आणि लोकसहभाग
बैठकीत आमदार जावळे म्हणाले की, जे पाणंद रस्ते नकाशावर दाखल नाहीत त्यांचे तातडीने मॅपिंग करून क्रमांक देणे आवश्यक आहे. यासाठी शेतशिवार फेऱ्या घेऊन शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
घरकुल लाभार्थी आणि आयुष्मान कार्ड मोहिमेला गती
घरकुल योजनेत ज्यांना मंजुरी मिळाली आहे त्यांना घरासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, असा आग्रह त्यांनी धरला. आरोग्याच्या दृष्टीने कोणताही नागरिक वंचित राहू नये, म्हणून येत्या १५ दिवसांत मिशन मोडमध्ये आयुष्मान भारत कार्डांचे वितरण व्हावे, असेही ते म्हणाले.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी बबन काकडे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, रावेर तहसीलदार बंडू कापसे, रावेर गटविकास अधिकारी विनोद मेढे, यावल गटविकास अधिकारी मंजुश्री बोरसे तसेच दोन्ही तालुक्यांचे नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आमदार अमोल जावळे यांनी बाल संगोपन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. रावेर मतदारसंघात सर्वाधिक प्रकरणे मंजूर झाल्याबद्दल विभागाचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत