धनाजी नाना महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागात शिक्षक दिन उत्साहात साजरा
धनाजी नाना महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागात शिक्षक दिन उत्साहात साजरा
फैजपूर (प्रतिनिधी) : तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील मानसशास्त्र विभागातर्फे गुरुवार, दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व हिंदी विभाग प्रमुख डॉ. कल्पना एल. पाटील यांनी भूषवले तर व्यासपीठावर प्रा. डॉ. सीमा बारी व प्रा. धीरज खैरे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून प्रा. डॉ. सीमा बारी यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व व या उपक्रमाचे वैशिष्ट्य याबद्दल माहिती दिली. यावर्षीचा विशेष उपक्रम म्हणजे विद्यार्थी स्वतः शिक्षक बनून वर्गात अध्यापन करत होते. या अंतर्गत द्वितीय वर्ष मानसशास्त्र विभागातील कु. चेतना नितीन पाटील हिने “मानसशास्त्रीय चाचणीच्या सहाय्याने व्यक्तिमत्व समजून घेणे” या विषयावर मार्गदर्शन केले. त्याच वर्गातील कु. सादिया फिरोज तडवी हिने “आरोग्य आणि ताण व्यवस्थापनासाठी जीवन कौशल्यांचा वापर” या विषयावर सत्र घेतले, तर तृतीय वर्षातील कु. सानिया मुबारक तडवी हिने “मानसशास्त्रीय संशोधनाचा समाजात उपयोग” या विषयावर सखोल विवेचन केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. कल्पना पाटील यांनी शिक्षक आयुष्य घडविण्यातील भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे उदाहरण देत शिक्षकांच्या प्रेरणादायी कार्यावर प्रकाश टाकला. तसेच पावलॉव्हच्या सिद्धांताचा संदर्भ देऊन साहचर्यामुळे वर्तनात होणारा बदल स्पष्ट केला. नेपोलियन बोनापार्ट यांच्या उदाहरणातून विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे असा संदेश दिला. विद्यार्थिनींना करिअर घडवण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अडचणींवर मात करण्यासाठी अरुणिमा सिन्हा, कल्पना चावला व बचेंद्री पाल यांसारख्या सहासी महिलांची उदाहरणे देत त्यांनी प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचा समारोप कु. सानिका संजय मेढे हिने आभार प्रदर्शनाने केला. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच अध्यापन कौशल्य विकसित करण्याची आगळीवेगळी संधी ठरला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत