चिनावल येथे विश्वकर्मा दिन मोठ्या उत्साहात साजरा
चिनावल येथे विश्वकर्मा दिन मोठ्या उत्साहात साजरा
लेवाजगत न्यूज चिनावल (ता. रावेर), दि. १७ :
येथील नूतन औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात दिनांक १७ सप्टेंबर रोजी भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. परिसरात आनंदी वातावरण निर्माण झाले होते.
विश्वकर्मा जयंती हा कामगार आणि कारागिरांचा उत्सव असून, दैवी शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे कार्य, मेहनत आणि कामातील अचूकतेचे स्मरण करण्याचा हा दिवस मानला जातो. महाराष्ट्र व राजस्थानमध्ये सप्टेंबर महिन्यात हा दिन विशेषत्वाने साजरा केला जातो.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन खेमचंद्र पाटील सपत्नींनी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजन केले. तसेच विविध उपकरणे व यंत्रांची पूजा करून कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या पूजाविधीत मंडळाचे पदाधिकारी व सदस्य— अध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष राजेंद्र फालक, चेअरमन खेमचंद पाटील, सेक्रेटरी गोपाळ पाटील तसेच कार्यकारिणी सदस्य सहभागी झाले.
या प्रसंगी भगवान विश्वकर्मा जयंतीला ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून घोषित करण्याची मागणीही केंद्र सरकारकडे करण्यात आली. कारण हा दिवस त्याग, कामातील नवनवीनता आणि कौशल्य यांचा संगम म्हणून गौरवला जातो. भगवान विश्वकर्मा हे वास्तुकलेचे तज्ञ मानले जातात. त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका, पांडवांसाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका निर्माण केली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते.
कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या शास्त्राचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सर्वांसाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यावेळी प्राचार्य संदीप चौधरी, फिटर निर्देशक सरजू होले, वि.वी. पाटील, आर.डी. इंगळे, आर.आर. महाजन, वैभव महाजन यांच्यासह सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत