Contact Banner

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा; एक लाखाची रोकड लुटली

 

Armed robbery at Union Minister Defence Khadse's petrol pump, cash worth Rs 1 lakh looted

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा; एक लाखाची रोकड लुटली
लेवा जगत न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर-मुक्ताईनगर  शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर गुरुवारी (दि. ९) रात्री सुमारे अकरा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आणि एक लाखाहून अधिक रोकड रक्कम लुटून पोबारा केला.

प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या वेळी पंपावर दोन कर्मचारी कामावर होते. त्याचवेळी एका आयशर वाहनात डिझेल भरण्याचे काम सुरू होते. अचानक पाच जण तिथे आले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना पंपाच्या केबिनमध्ये ओढून नेले. तेथे बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्या जवळील रोकड हिसकावून घेतली.

दरोडेखोरांनी कुठलाही पुरावा मागे राहू नये यासाठी केबिनमधील संगणकाची तोडफोड केली आणि सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआरही चोरून नेला. त्यामुळे घटनेचा कोणताही दृश्य पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील दहिवद येथेही पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता. त्यामुळे अल्पावधीत दोन दरोड्यांच्या घटना घडल्याने महामार्गावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, पाच अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून आसपासच्या परिसरातील हॉटेल, टोलनाके, तसेच सीसीटीव्ही तपासले जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.