भिरूड सरांचा सेवानिवृत्ती सोहळा थाटात संपन्न — दोन ते तीन हजार शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती
भिरूड सरांचा सेवानिवृत्ती सोहळा थाटात संपन्न — दोन ते तीन हजार शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती
लेवा जगत न्यूज प्रतिनिधी, जळगाव :कै. सुनीता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलचे ज्येष्ठ कलाशिक्षक एस. डी. भिरूड सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या थाटात व जल्लोषात पार पडला. त्यांच्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ आणि अतुलनीय सेवेला मानाचा मुजरा करण्यासाठी महाराष्ट्रभरातून दोन ते तीन हजारांहून अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सेवेला सलाम करणाऱ्या मान्यवरांची मांदियाळी
भिरूड सरांच्या सेवापूर्ती सोहळ्यास विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त प्राचार्य तथा डी.ई.आय.ई.टी. जळगावचे मा. आप्पासाहेब निळकंठ गायकवाड यांनी भूषविले.
प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारच्या राज्यमंत्री मा. रक्षाताई खडसे, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय सावकारे, तसेच वस्त्रोद्योग मंत्री आणि खान्देश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. मेजर नानासाहेब वाणी हे उपस्थित होते.
याशिवाय नाशिक विभागाचे शिक्षक आमदार मा. किशोर भाऊ दराडे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, जळगाव शहराचे आमदार मा. सुरेश मामा भोळे, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका मा. केतकीताई पाटील, क. ब. च. विद्यापीठाचे सिनेट सदस्य विष्णू भंगाळे, माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, कला शिक्षक संघाचे अध्यक्ष शेरशहा डोंगरी, संस्थापक मल्लिकार्जुन सिंदगी आदी मान्यवरांची उपस्थिती विशेष ठरली.
भिरूड सरांच्या कार्याला सर्वत्र मान्यता
भिरूड सरांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्ताने सर्वच वक्त्यांनी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचे कौतुक केले.
राज्यमंत्री रक्षाताई खडसे म्हणाल्या, “आज या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिक्षक आले आहेत, हीच भिरूड सरांच्या कार्याची जिवंत साक्ष आहे. भविष्यात आम्हाला निवृत्त होताना एवढी उपस्थिती लाभेल की नाही, याची शंका वाटते!”
मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी भिरूड सरांसोबतच्या 35 वर्षांच्या मैत्रीचा उल्लेख करत भावूक होत म्हटले, “भिरूड सर म्हणजे शिक्षकांसाठी चालते-बोलते मंत्रालय आहेत.”
आमदार किशोर दराडे म्हणाले, “शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यात भिरूड सरांचा तोड नाही. त्यांच्या प्रत्येक संघर्षात शिक्षकहिताचे व्रत आहे.”
तर डॉ. सुधीर तांबे यांनी गौरवोद्गार काढले, “भिरूड सर हे केवळ शिक्षक नव्हते, तर एक विचारवंत नेतृत्व होते.”
भिरूड सरांचे मनोगत — “कलेची उपासना आणि शिक्षकांचा आधार”
या भावनिक क्षणी बोलताना भिरूड सर म्हणाले,
“गेल्या 38 वर्षांच्या सेवेत मी केवळ कला शिकवली नाही, तर शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी घरदार बाजूला ठेवून महाराष्ट्र, भारत व विदेश दौरे केले. शिक्षक बांधवांच्या समस्या माझ्यासाठी वैयक्तिक होत्या. आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमुळे हे कार्य फळाला आल्यासारखे वाटते.”
अध्यक्षीय भाषण — ‘खणखणीत हिरा’
अध्यक्षस्थान भूषविणारे आप्पासाहेब गायकवाड यांनी आपल्या भाषणात म्हटले,
“भिरूड सर म्हणजे खणखणीत कर्तृत्वाच्या भट्टीतून निघालेला २४ कॅरेटचा हिरा आहे. त्यांनी कलेचा ब्रश विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी वापरला आणि आंदोलन, संप, धरणे यांसारख्या मार्गांनी शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी लढा दिला.”
समाजभानही जपणारा सोहळा
या सोहळ्यात सामाजिक उत्तरदायित्व जपत, जळगाव जिल्हा शिक्षक शिक्षकेतर नागरी सहकारी पतपेढीच्या सर्व संचालकांनी मिळून पूरग्रस्तांसाठी 11 लाख रुपयांचा मदतनिधी पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुपूर्त केला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
भव्य दिव्य सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन “न्यूज वर्ल्ड” येथे करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी यु.यू. दादा पाटील, जे.के. अण्णा पाटील, संभाजी आप्पा पाटील, आर.एच. बाविस्कर, उदय बापू पाटील, एच.जी. इंगळे, सुनील गरुड, अजबसिंग पाटील, सी.सी. वाणी, अजय देशमुख, राजेंद्र भारंबे, साधनाताई लोखंडे, पुष्पाताई पाटील, वैशालीताई महाजन, शैलेश राणे, भगतसिंग पाटील, गोपाळ पाटील, योगेश भोईटे, एस.के. पाटील, अरुण सपकाळे, डी.ए. पाटील, नितीन महाजन, अजित पाटील, एन.ओ. चौधरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैशाली महाजन यांनी केले.
एक अखंड तपस्येला मानाचा मुजरा
भिरूड सरांचा हा सेवापूर्ती समारंभ हा केवळ निवृत्तीचा सोहळा नव्हता, तर शिक्षक चळवळीच्या इतिहासातील प्रेरणादायी अध्याय होता.
एका सच्च्या शिक्षकाच्या अथक, निःस्वार्थ सेवेला संपूर्ण शिक्षक समाजाने आज मानाचा मुजरा केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत