Contact Banner

पाल घाटात ब्रेक फेल; क्रुझर उलटली-एक ठार, ११ शेतकरी जखमी

 

Brake failure at Pal Ghat; Cruiser overturns; One dead, 11 injured

पाल घाटात ब्रेक फेल; क्रुझर उलटली – एक ठार, ११ शेतकरी जखमी
लेवा जगत न्यूज नेटवर्क वरणगाव पाल (ता. रावेर) – रावेर तालुक्यातील पाल येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनाला जात असताना शेतकऱ्यांची क्रुझर वाहन अपघातग्रस्त झाली. ब्रेक फेल झाल्यामुळे वाहन पाल घाटात उलटून एक शेतकरी ठार, तर ११ जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास घडला.

मृत शेतकऱ्याचे नाव विजय धर्मा राणे (वय ४८, रा. अंजनसोडे, ता. भुसावळ) असे आहे. भुसावळ तालुक्यातील फुलगाव व अंजनसोडे येथील महिला आणि पुरुष शेतकरी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी क्रुझर (क्रमांक एमएच-१९ सीएफ-३९२०) या वाहनाने पाल येथे जात होते. वाहनात एकूण १२ शेतकरी प्रवास करत होते.

पाल घाटात चढाव पार करून उतारावर येताच वाहनाचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालक प्रशांत चौधरी (वय ३५) यांनी वाहन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला; मात्र उतारामुळे वाहनावर ताबा सुटला आणि क्रुझर उलटली. अपघातात विजय राणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर ११ शेतकरी गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील आणि हतनूरचे उपसरपंच सचिन इंगळे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना उपचारासाठी भुसावळ येथील दवाखान्यात हलविण्याची व्यवस्था केली. घटनेची माहिती मिळताच मंत्री संजय सावकारे यांनी कृषी विभागाला मदतीचे आदेश दिले आणि स्वतः भुसावळ येथे येऊन जखमी शेतकऱ्यांची विचारपूस केली.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे:
जगन्नाथ बापू कोळी (६४), उज्ज्वला नितीन पाटील (३६), इंदुबाई पंडित पाचपांडे (६०), प्रभाकर राघो कोळी (४०), पद्माकर शामराव पाटील (५५), समाधान बळीराम पाटील (५५), केलास नारायण पाटील (५६), दिगंबर शालिग्राम पाटील (५६), गणेश शिवराम चौधरी (५४), विमल राजेंद्र चौधरी (५२, रा. फुलगाव), राजेंद्र अमृत चौधरी (५६) आणि चालक प्रशांत चौधरी (३५).

या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात या घटनेने शोककळा पसरली आहे.

लेवाजगत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.