गज़ाला तबस्सुम सय्यद असगर अली यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’
गज़ाला तबस्सुम सय्यद असगर अली यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’
लेवा जगत न्यूज नेटवर्क-महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी तर्फे उर्दू भाषा आणि साहित्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. याच पार्श्वभूमीवर या वर्षी रसूलपूर (ता. रावेर) येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील उपक्रमशील व कार्यतत्पर शिक्षिका गज़ाला तबस्सुम सय्यद असगर अली (शेख कमालुद्दीन) यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्काराद्वारे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय सेवेला मान्यता मिळाली आहे. विशेषतः कोविड-१९ काळात ऑनलाइन अध्यापनाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवणे, “आपला जिल्हा – आपले उपक्रम” या पुस्तकाच्या प्रकाशनात सहभाग आणि शिक्षण क्षेत्रातील विविध नवकल्पना राबविणे या कार्यांची दखल अकादमीने घेतली.
मुंबई येथील एस.व्ही.पी. स्टेडियममध्ये आयोजित महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी डॉ. सोहेब हाश्मी यांच्या हस्ते गज़ाला तबस्सुम यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि शाल प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे, नवाब मलिक, सना मलिक, अली असगर, शेखर सुमन, जावेद अख्तर, महेशर आफ्रिदी, उबेद आझम आझमी, साबीर मुस्तफा अबादी, डॉ. हारून सेठ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
या सन्मानानंतर रावेर तालुका आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
गज़ाला तबस्सुम यांच्या या यशामुळे खानदेश प्रदेशाला अभिमान वाटत असून, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांसाठी हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत