चिनावल ग्रामपंचायतला ‘माझी वसुंधरा ४.०’ राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा मान
चिनावल ग्रामपंचायतला ‘माझी वसुंधरा ४.०’ राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा मान
चिनावल (लेवाजगत न्यूज वार्ताहर)रावेर तालुक्यातील चिनावल ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा ४.०’ या राज्यस्तरीय अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून, २ कोटी २५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून चिनावल ग्रामपंचायतीने राज्यभरात आदर्श निर्माण केला आहे.
‘जल, अग्नी, वायू, आकाश आणि पृथ्वी’ या पंचतत्त्वांवर आधारित उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धनाचे कार्य करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच सौ. ज्योती संजय भालेराव, उपसरपंच शाहीन बी. शेख जाबीर, तसेच तात्कालीन ग्रामविकास अधिकारी कैलास भगत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ही प्रभावी अंमलबजावणी झाली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बॉम्बे एक्झिबिशन, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात सरपंच सौ. ज्योती भालेराव, उपसरपंच शाहीन बी. शेख जाबीर आणि ग्रामविकास अधिकारी दीपक कोळी यांनी सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र स्वीकारले. यावेळी राज्य वातावरणीय कृती कक्षाचे संचालक सुधाकर बोबडे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबईचे अभिजीत घोरपडे, तसेच वरिष्ठ कार्यकारी संचालिका उत्कर्षा कवडी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या यशात जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी मीनल करणवाल, तत्कालीन रावेर गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, तसेच प्रवीण शिंदे, विनोद मेढे आणि हेमचंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाचाही मोठा वाटा राहिला.
सरपंच सौ. ज्योती भालेराव :-
“‘माझी वसुंधरा ४.०’ अभियानात चिनावल ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून २.२५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. यातून १ कोटी १२.५ लाखांचा निधी ग्रामपंचायतीला प्राप्त झाला असून, या निधीतून गावात पर्यावरणपूरक आणि लोकहिताचे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. हे यश ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आणि अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत