रावेर नगरपरिषदेला ५२ लाखांची अभ्यासिका मंजूर-आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांना यश
रावेर नगरपरिषदेला ५२ लाखांची अभ्यासिका मंजूर-आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांना यश
रावेर (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी)
रावेर शहरातील विद्यार्थ्यांना व स्पर्धा परीक्षार्थ्यांना अत्याधुनिक अध्ययन केंद्राची सुविधा मिळणार आहे. शासनाच्या विशेष अनुदान योजनेअंतर्गत रावेर नगरपरिषदेला ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीतून आधुनिक व सुसज्ज अभ्यासिका (स्टडी सेंटर) उभारण्यात येणार आहे.
रावेर शहरात दर्जेदार आणि शांत वातावरणातील अभ्यासिकेची मागणी अनेक वर्षांपासून होती. या गरजेची जाण ठेवत आमदार अमोलभाऊ जावळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळत शासनाने हा निधी मंजूर केला आहे.
आमदार अमोलभाऊ जावळे यांनी सांगितले की,
“शिक्षण आणि अभ्यास याबद्दल माझ्या मनात सदैव विशेष जिव्हाळा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी उपलब्ध करून देणे ही माझी प्राथमिकता आहे. या अभ्यासिकेमुळे रावेर व परिसरातील युवकांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी प्रेरणा आणि योग्य वातावरण मिळेल.”
या निर्णयामुळे रावेर शहरात आनंदाचे वातावरण आहे. नागरिक, पालक आणि विद्यार्थीवर्गाने आमदारांच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून, नगरपरिषदेच्या पुढाकारातून ही अभ्यासिका अत्याधुनिक सोयीसुविधांसह लवकरच ज्ञानकेंद्र म्हणून उभारली जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत