दिवाळीत बाहेरगावी जाताना सावधगिरी बाळगा — सावदा पोलिसांचे जनतेस आवाहन
दिवाळीत बाहेरगावी जाताना सावधगिरी बाळगा — सावदा पोलिसांचे जनतेस आवाहन
लेवाजगत न्यूज सावदा — दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अनेक कुटुंबे सण साजरा करण्यासाठी आपल्या मुळगावी किंवा नातेवाईकांकडे जात असल्याने सावदा पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना विशेष आवाहन करण्यात आले आहे. शाळा व सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे शहरातील अनेक घरे बंद राहणार असल्याने चोरीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे पोलीसांनी स्पष्ट केले आहे. घरात मौल्यवान वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने किंवा रोख रक्कम ठेवू नये, या वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात किंवा सोबत घेऊन जाव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे. घर बंद करून बाहेरगावी जाताना आपल्या शेजाऱ्यांना व स्थानिक पोलीसांना याची माहिती देणे आवश्यक आहे. गल्लीतील अनेक कुटुंबे सुट्टीवर गेल्यास काही दिवसांसाठी रात्रगस्तीसाठी गुरखा नेमावा आणि याबाबत पोलिसांना कळवावे. बंद घराच्या परिसरात लाईट सुरू राहील याची व्यवस्था करावी, तसेच गल्लीमध्ये किंवा घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि शेजाऱ्यांशी सतत संपर्क ठेवावा. “आपला शेजारी हा खरा पहारेकरी” या म्हणीप्रमाणे शेजाऱ्यांना विश्वासात घेऊन माहिती देणे आवश्यक आहे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती दिसल्यास किंवा फिरताना आढळल्यास त्वरित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा डायल 112 वर कॉल करावा. संशयित व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी त्यास मारहाण करू नये, असेही पोलीसांनी स्पष्ट केले आहे. आपल्या आयुष्याची कमाई ही बंद घरात ठेवून पश्चातापाची वेळ आणू नका, ती सुरक्षितरीत्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावी, असा सल्ला सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी नागरिकांना दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत