Contact Banner

वरणगाव येथे गुन्हे शाखेची धडक कारवाई – विना परवाना शस्त्रासह आरोपी अटक

वरणगाव येथे गुन्हे शाखेची धडक कारवाई – विना परवाना शस्त्रासह आरोपी अटक


वरणगाव येथे गुन्हे शाखेची धडक कारवाई – विना परवाना शस्त्रासह आरोपी अटक

लेवा जगत न्यूज,प्रतिनिधी भुसावल :
जळगाव जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी आगामी सण-उत्सव तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव श्री. राहुल गायकवाड यांना देण्यात आल्या होत्या.

त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय सूत्रांमार्फत माहिती मिळाली की, वरणगाव शहरातील रिकॉर्डवरील आरोपी संजय गोपाळ चंडेले (वय ५०, रा. दर्यापूर शिवार, ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव) हा विना परवाना शस्त्र बाळगून फिरत असून नागरिकांमध्ये दहशत माजवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय चंडेले हा तिरंगा चौक परिसरात येणार असल्याचे समजल्याने गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले.

गुन्हे शाखेचे पथक रात्री सुमारे ११.३० वाजता तिरंगा चौक परिसरात पोहोचले असता, झाडाजवळ एक संशयित इसम उभा दिसला. त्यास थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव संजय गोपाळ चंडेले असे सांगितले. पथकाने तत्काळ त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले आणि एक जिवंत काडतूस असा एकूण रु. ५०,५००/- किंमतीचा अवैध शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. २१३/२०२५, आर्म्स अॅक्ट कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ सुभाष सपकाळ हे करीत आहेत. अटक आरोपी संजय चंडेले याच्यावर यापूर्वीही गुन्हा क्र. ०२/२०२२ आणि २८/२०२२ (आर्म्स अॅक्ट ३/२५) प्रमाणे गुन्हे वरणगाव पोलीस ठाण्यात नोंद आहेत.

ही कारवाई मा. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अप्पर पोलिस अधीक्षक श्री. अशोक नखाते, तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक (गुन्हे शाखा) श्री. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पो.उ.निरीक्षक शरद बागल, ग्रे.पो.उनि. रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोना विकास सातदीवे, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोकॉ प्रशांत परदेशी, पोकॉ राहुल वानखेडे, तसेच चापोकॉ भारत पाटील यांनी सहभाग घेतला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.