वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; दिवाळीसाठी आला होता गावी किनगाव येथील दुर्दैवी घटना; वापी येथे कंपनीत होता नोकरीला
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; दिवाळीसाठी आला होता गावी
किनगाव येथील दुर्दैवी घटना; वापी येथे कंपनीत होता नोकरीला
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी, यावल :
तालुक्यातील किनगाव येथे सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आपल्या गावी आलेल्या या तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य उर्फ बाळा प्रमोद पाटील (वय २२, रा. किनगाव बुद्रुक, ता. यावल) हा तरुण सध्या गुजरात राज्यातील वापी येथील एका कंपनीत नोकरीला होता. दिवाळी साजरी करण्यासाठी तो रविवारीच गावी आला होता. सोमवारी दुपारी तो आपल्या एमएच.१९-ईजे.२१७० या क्रमांकाच्या दुचाकीने किनगाव बसस्थानक परिसरातून जात असताना हा अपघात घडला.
त्याचवेळी एमएच.१९-बीएम.४३३२ क्रमांकाची मालवाहू पिकअप वाहन यावलकडून चोपड्याकडे लोखंडी खांब घेऊन जात होती. बसस्थानकाजवळ दुचाकी व पिकअपची जोरदार धडक होऊन आदित्य पाटील गंभीर जखमी झाला. नागरिकांनी तातडीने त्याला स्थानिक दवाखान्यात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
अपघातानंतर संबंधित पिकअप चालक स्वतः वाहनासह यावल पोलिस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी पोलिसांनी आवश्यक पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे किनगाव परिसरात शोककळा पसरली आहे. उत्सवी दिवाळीच्या काळात एका तरुणाचा झालेला मृत्यू ही अत्यंत वेदनादायी घटना असल्याचे ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आले. आदित्य पाटील हा अभ्यासू, विनम्र आणि सर्वांचा लाडका मुलगा म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत