Header Ads

Header ADS

भारूड लेखनातून समाजप्रबोधन करणाऱ्या मंदाकिनी पाटील यांना श्रद्धांजली


  
प्रा. डॉ. मंदाकिनी पाटील आईंनी भारूड लेखनातून समाज प्रबोधन करत संघर्षातून यशाकडे वाटचाल करणाऱ्या तेजस्वी आयुष्याला भावपूर्ण श्रद्धांजली

लेवाजगत मराठी लेख:-  खेमचंद गणेश पाटील (हंबर्डी/बदलापूर):- आयुष्य बऱ्याचदा माणसाला हुलकावणी देत असतं. त्याच्या सुप्त मनातील इच्छांना मार्ग मोकळा कारून देत असतं. मात्र माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला त्याच्या ऐच्छिक गोष्टी तात्काळ हव्या असतात.

  संयम हा त्याच्या जवळ राहत नाही. आताच्या पिढीला तर हे तंतोतंत लागू पडते. परंतु ज्याच्याजवळ स्वप्ने आहेत, इच्छा आहेत, जीवनात काही करण्याची इच्छाशक्ती आहे त्या व्यक्तीला अनंत अडचणीतून देखील मार्ग सापडत जातात आणि त्याला त्याच्या मनातील इप्सित साध्य करण्यासाठी जणू ही नियती, हा काळ देखील एक प्रकारे मदतच करीत असतो. अशाच एक जीवन प्रवाशाचा प्रवास आपण येथे उलगडत आहोत.  भारूड लेखनातून समाज प्रबोधन करीत आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेल्या स्वर्गीय प्रा. डॉ. मंदाकिनी दिनकर पाटील. मंदाकिनी आईबद्दल जर चार ओळीत सांगायचे झाल्यास असेच म्हणता येईल की, 


प्रयत्नांच्या बळावर सर करता येते शिखर, 

लाथ मारेन तिथे पाणी काढेन अशी ठेवा जिगर

दुर्गम कडा भेदण्याची ठेवा दुर्दम्य अभिलाषा

मग येणारच नाही तुमच्याजवळ निराशा ||


                             ही कविता जशीच्या तशी स्वर्गीय प्रा.डॉ. मंदाकिनी पाटील यांच्या जीवनाला साजेल अशीच आहे. या कवितेप्रमाणे त्यांच्या आयुष्यात अनंत अडचणी आल्यात परंतु त्यातून मार्ग देखील निघत गेले. रावेर तालुक्यातील खिरोदा येथील माहेर असलेल्या प्रा. डॉ. मंदाकिनी पाटील ह्या अतिशय शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत, नाते जपणाऱ्या तसेच उच्चविद्याविभूषित आहेत.


जन्म, शिक्षण आणि वॆवाहिक जीवन -                                         

        मंदाकिनीआईंचा जन्म २४ ऑक्टोबर १९४९ रोजी रावेर तालुक्यातील खिरोदा या गावी बळीराम चौधरी व चमेली चौधरी  या दांपत्याच्या पोटी झाला.  मंदाकिनी पाटील यांचे प्राथमिक शिक्षण फैजपूर येथे तर माध्यमिक शिक्षण आर. आर. विद्यालय जळगांव येथे झाले. १९६७ ला अकरावी (मॅट्रिक पास) झाल्या. मॅट्रिक झाल्यानंतर यावल तालुक्यातील हंबर्डी येथील प्रा. दिनकर धोंडू पाटील यांच्या सोबत विवाहबद्ध झाल्या होत्या. पती प्रा. दिनकर पाटील यांनी एम.एस्सी. गणित विषयातविद्यापीठात प्रथम येण्याचा मान पटकावला होता. ते एम. जे. कॉलेज जळगांव येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. प्रा. डॉ. मंदाकिनी पाटील जळगांव येथे वास्तव करून आयुष्याची सुरवात करत असतांना परिस्थितीचे चटके सहन करीत अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतांना सुद्धा त्यांनी मुलगी वर्षा हिला बी.एड. एम. एस्सी. (गणित) (पुणे) पर्यंत शिक्षण दिले तसेच  मुलगा राहूल हा बी.ई. केमिकल एम. बी.ए. मार्केटिंग (दुबई) रिजनल सेल्स मॅनेजर आहेत. तर लहान मुलगा डॉ. अतुल एम.डी.डी.एन.बी. (भूलतज्ञ) जळगांव असे तीन आपत्य मंदाकिनी पाटील यांना आहेत.


इच्छा तेथे मार्ग - 


               ''इच्छा तेथे मार्ग'' असे म्हटले जाते. परिश्रम करणाऱ्याच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी नियती देखील मदत करीत असते. मंदाकिनी ताईंच्या जीवन प्रवासात त्यांना याची प्रचिती बऱ्याचदा आली. घर संसार चालवीत असतांना पुढील शिक्षण घेण्याची मनोमन इच्छा असल्याने लग्नानंतर अवघ्या १४ वर्षांनी एम. जे. कॉलेज जळगाव येथे शिक्षणास प्रारंभ केला मंदाकिनी पाटील मॅडम यांना बालपणापासूनच मराठी विषयाची आवड असल्याने त्यांनी बी. ए. १९८५ मध्ये फास्ट क्लास पास झाल्या. नंतर एम.ए. १९८७ मध्ये प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाल्या. त्या नंतर सेट १९९५ ला पुणे विद्यापीठातून पूर्ण केल्यानंतर त्यांनी कला व वाणिज्य महिला    महाविद्यालयात जळगांव (एस.एन.डी.टी.) मुबंई संलग्न येथे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले. त्या वेळेस त्यांनी अनेक गरीब मुला मुलीना शिक्षण घेण्यासाठी मोठी मदत सुद्धा केली. त्यांनी अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करीत असताना उच्च शिक्षण  शिक्षणापर्यंत संपूर्ण मदत स्वतः करून शिक्षित केले आहे. १९९९ मध्ये पी.एच.डी.पदवी त्यांनी पुणे विद्यापीठातून प्राप्त केली. त्या बोलताना नेहमी सांगतात कशीही परिस्थिती आली तरीही सकारात्मकतेने, धैर्याने आणि मुल्यांशी तडजोड न करता आहे. त्या परिस्थितीला सामोरे जायचे, संकटातून मार्ग काढायचा अशी शिकवण सर्वांना देत असतात. त्यांचा साहित्याबद्दल खूप मोठा अभ्यास असल्याने त्यांनी आयुष्याच्या वाटचालीत संवेदनशील मनाला जे जे जाणवलं जे जे हृदयाला स्पर्शून गेलं ते वेगवेगवेगळ्या सहित्य प्रकारातून अभिव्यक्त होत राहीले 


        अशाप्रकारे कवितासंग्रह होईल एवढ्या कविता वृद्धाश्रम, निसर्गाच्या कुशीत केंद्रबिंदू, खंत, यांच्या सह संगोपन, नाट्यछटा पथनाट्य, छोट्या नाटिका यासह अनेक कथा व कविता अप्रकाशित सुद्धा आहे. त्यांनी प्रकाशित केलेले ''अळीमीळी गपचिळी''  (बालगीत संग्रह) आणि आधुनिक भारुडे ह्या दोन पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहे. त्यांच्या या आधुनिक भारुडां च्या लेखनास सुरुवात झाली ती मुळात समाजप्रबोधन आणि जनजागृती या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिरात सादर करण्यासाठी भ्रूणहत्या, अंधश्रद्धा, एड्स, नवरदेवाचा बाजार, बायकोचा हिसका अन् दारूचा धसका, यासारख्या भारुडांचे लेखन करून त्यांनी समाज जनजागृती व परिवर्तनास मोलाचा हातभार लावला आहे. आपत्ती व्यवस्थापन ग्लोबल मार्मिक , दहशतवाद, भ्रष्टाचार या साऱ्या जगाला भेडसावून सोडणाऱ्या समस्यांवर भारुड लेखन मयत शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ज्वलंत समस्येवर भारुडे करून परिस्थितीनुसार ज्या ज्या समस्या समोर आल्या त्यांच्या संदर्भात संगोपांग विचार करून उपाययोजना सुचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच भारुड च्या माध्यमातून प्राध्यापक मंदाकिनी पाटील यांनी भरपूर लेखन केले. त्यात त्यांनी १) अळीमीळी गपचिळी (बालगीत संग्रह). २) आधुनिक भारुडे.  यासह त्यांचे विविध वृत्तपत्रात लेख समाज प्रबोधनात्मक लेख प्रकाशित होत असायचे.


कार्य व सन्मान-: 


१) शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य एम पी एस सी परीक्षेच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिका काढल्या आहेत. २) साप्ताहिक लोकहितदर्पण या वृत्तपत्राच्या संपादक मंडळाचे सदस्य म्हणून कार्य. ३) कुसुमताई चौधरी महिला कल्याणी द्वारा आयोजित परिसंवाद व काव्यवाचन सत्रात सहभाग २४ व २५ सप्टेंबर २००५. ४) आम्ही भारतीय या अभियानांतर्गत प्रकाशित आम्ही भारतीय पुस्तकात सप्तपदी आज ची कविता प्रकाशित १६ जून २००७. ५) आकाशवाणी जळगाव केंद्रावर वृद्धाश्रम कथेचे ध्वनिशेपण केले. ६) भृणहत्या या भारुड जळगाव जिल्हा महिला असोसिएशन जळगाव व जिल्हा पोलीस दल आणि नेमिचंद हिरालाल जैन ट्रस्ट आयोजित श्री भृणहत्या घातक कृती या लेखनाच्या स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक तसेच विद्यार्थिनींना सादरीकरणाचे प्रथम पारितोषिक. ७) महाराष्ट्र राजर्षी शाहू अकॅडमी मी खोपोली जिल्हा रायगड आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत कवितेला उत्तेजनार्थ बक्षीस व सन्मान. ८) अहिर सुवर्णकार महिला मंडळ जळगाव आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त आणि घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस व सन्मान.

९) आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था डोंबिवली यांच्यातर्फे  लेवा साहित्यिक रत्न २०२२ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

    शैक्षणिक व साहित्यिक वाटचालीत मंदाकिनी पाटील यांचे पती कै. प्रा. डी. डी. पाटील यांनी दिलेली साथ आणि प्रोत्साहन त्यांना खूप मोलाचे होते, तसेच त्यांच्या साहित्याचे प्रथम वाचक होते कारण ते स्वतः रसिक होते त्यांना स्वतःला साहित्याची मराठी भाषेची आवड व जाण होती.

           आयुष्यभर आपल्या लेखणीतून समाजात प्रबोधन करत मंदाकिनी आई  यांनी कार्य केले. 

 आठवणी तुमच्या

 खोल अंतरी रूजलेल्या

 पाकळ्या गुलमोहराच्या

 नित नवीन फुललेल्या

 ठायी तुमच्या


स्वर्गीय मंदाकिनी आई पाटील भावपूर्ण श्रद्धांजली


खेमचंद गणेश पाटील 

(हंबर्डी/बदलापूर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.