खडसे यांच्या बंगल्यातील चोरी प्रकरणाला नवा कलाटणी — संवेदनशील कागदपत्रं आणि सीडी गायब
खडसे यांच्या बंगल्यातील चोरी प्रकरणाला नवा कलाटणी — संवेदनशील कागदपत्रं आणि सीडी गायब
लेवाजगत न्यूज, जळगाव :-राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात झालेल्या चोरीच्या प्रकरणाला आता नवा कलाटणी मिळाला आहे. सुरुवातीला या घटनेत केवळ दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे सांगितले जात असले, तरी आता संवेदनशील कागदपत्रं, सीडी आणि पेनड्राईव्ह चोरीस गेल्याचे स्वतः खडसे यांनीच बुधवारी माध्यमांसमोर उघड केले आहे.
२७ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या या चोरीत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सहा ते सात तोळे सोने आणि सुमारे ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. मात्र, नंतर घरातील सर्व वस्तूंची तपासणी करताना काही महत्त्वाची कागदपत्रं, सीडी आणि पेनड्राईव्हही गायब असल्याचे आढळले. या वस्तूंमध्ये नेमकी कोणती माहिती होती, यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना खडसे म्हणाले, “या चोरीमागे केवळ आर्थिक नव्हे तर राजकीय हेतूही असू शकतात. पोलिसांनी याची गंभीर चौकशी करावी.” त्यांनी पुढे सांगितले की, काही कागदपत्रं ही त्यांनी माहिती अधिकारातून मागविलेली असून, भ्रष्टाचाराशी संबंधित माहिती त्यात होती. सीडींमध्येही काही संवेदनशील डेटा असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र त्याबाबत अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.
खडसे यांनी असेही म्हटले की, “घरात कुठे काय ठेवले आहे, हे माहिती नसल्याशिवाय अशी चोरी शक्य नाही. चोरीच्या आधी परिसरातील लाईट बंद झाले होते, त्यामुळे हा केवळ साधा गुन्हा नसून सखोल कटकारस्थान असण्याची शक्यता आहे.”
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला असून, या प्रकरणाचा उलगडा करणे हे पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. खडसे यांनीही तपास यंत्रणांवर विश्वास व्यक्त करत सांगितले की, “ही चोरी राजकीय दृष्ट्या संवेदनशील असल्याने गुन्हेगारांचा शोध नक्की लागेल.”
एकूणच, खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यातील चोरी प्रकरणाने राजकीय आणि माहिती-संवेदनशील वळण घेतले आहे. चोरी गेलेल्या सीडी व कागदपत्रांमधील माहिती नेमकी काय होती, याचा उलगडा आगामी काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत