माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ‘मुक्ताई’ निवासस्थानी चोरी-बंद घराचे कुलूप तोडून ऐवज लांबवला; शहरात खळबळ
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ‘मुक्ताई’ निवासस्थानी चोरी-बंद घराचे कुलूप तोडून ऐवज लांबवला; शहरात खळबळ
लेवाजगत न्यूज | जळगाव :-शहरात चोरट्यांच्या साखळी घटनांमुळे आधीच निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांच्या ‘मुक्ताई’ या निवासस्थानी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शहरभर एकच खळबळ उडाली असून, राजकीय नेत्यांच्या घरांनाही सुरक्षेची हमी उरली नाही, अशी चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवरामनगर परिसरातील ‘मुक्ताई’ बंगला दिवाळीच्या सुटीनिमित्त बंद होता. खडसे हे या काळात मुक्ताईनगर येथे वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळी त्यांचे सहकारी नेहमीप्रमाणे बंगल्यावर पोहोचले असता, मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले आढळले. घरात प्रवेश करून पाहणी केल्यावर सर्व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसले, ज्यावरून चोरी झाल्याची खात्री पटली.
घटनेची माहिती मिळताच एकनाथराव खडसे यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. काही मिनिटांतच पोलिस अधिकारी आणि गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. घराचा पंचनामा आणि सीसीटीव्ही तपास सुरू असून, चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, चोरीत नेमका किती माल लंपास झाला आणि आर्थिक नुकसान किती झाले याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार काही मौल्यवान वस्तू आणि रोकड चोरीस गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, उच्चपदस्थ राजकीय नेत्यांच्या घरांवरच चोरीचा हात पडल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी विशेष पथक तयार करून तपासाला गती दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत