दुःखद अपघात! प्रवासी बस पेटली – २५ जणांचा होरपळून मृत्यू
दुःखद अपघात! प्रवासी बस पेटली – २५ जणांचा होरपळून मृत्यू
लेवाजगत न्युज कुर्नूल - आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील चिन्नाटेकुर परिसरात शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याने तब्बल २५ प्रवासी जिवंत जळाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून बस प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली. समोरून येणाऱ्या दुचाकीची बसशी जोरदार टक्कर झाली. या धडकेत दुचाकी थेट बसखाली गेली आणि बसच्या इंधन टाकीला धडक लागल्याने ती पेट घेतली. काही क्षणांतच बसला भीषण आग लागली आणि प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी वेळही मिळाला नाही.
प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये सुमारे ४० प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी २५ जणांचा जळून मृत्यू झाला, तर काहींना गंभीर भाजल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक मृतदेह पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची प्रतिक्रिया
आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करत म्हटलं,
> “कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकूर गावाजवळ झालेल्या भीषण बस आगीच्या दुर्घटनेबद्दल ऐकून मला धक्का बसला. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आहेत. तसेच या घटनेत जखमी आणि बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत सरकार करेल.”
टीडीपी आमदार लोकेश नारा यांनीही दुःख व्यक्त करत म्हटलं,
> “कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकूर गावाजवळ झालेल्या भीषण बस आगीच्या दुर्घटनेची बातमी हृदयद्रावक आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझी तीव्र सहानुभूती व्यक्त करतो.”

कोणत्याही टिप्पण्या नाहीत