Contact Banner

“हातावर सुसाइड नोट लिहून महिला डॉक्टरची आत्महत्या; दोन पोलिसांवर बलात्कार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप”


 “हातावर सुसाइड नोट लिहून महिला डॉक्टरची आत्महत्या; दोन पोलिसांवर बलात्कार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप”


लेवाजगत न्युज (फलटण) सातारा:- 


फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण सातारा जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टरच्या तळहातावर सुसाइड नोट लिहिलेली आढळली असून त्यात दोन पोलिस अधिकाऱ्यांवर बलात्कार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे.


मृत डॉक्टरने सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे की, “माझ्या मरण्याचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आहे, ज्याने माझ्यावर पाच वेळा बलात्कार केला, तसेच प्रशांत बनकर ज्याने मागील चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला.” अशी स्पष्ट नोंद तिच्या हातावर लिहिल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.


या घटनेची माहिती मिळताच फलटण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. डॉक्टरच्या हातावरील सुसाइड नोटचे फॉरेन्सिक तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले असून लेखन तिच्याच हस्ताक्षरात आहे का, याची खातरजमा केली जाणार आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.


या घटनेनंतर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात राज्यातील विविध राजकीय पक्षांनीही सरकारवर टीका केली आहे.


शिवसेनेच्या (उबठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले की, “जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच जर गुन्हे करत असतील तर नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे जावे? राज्याचा गृहविभाग झोपेत आहे का?” असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


दरम्यान, काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “कायद्याचे रक्षक जर भक्षक बनले, तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी असू शकत नाही. या महिलेला किती त्रास सहन करावा लागला असेल, याची कल्पना करवत नाही. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी.”


पोलीस प्रशासनाने मात्र या प्रकरणावर अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


फलटणमधील या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही धक्का बसला असून, एक सुशिक्षित महिला डॉक्टर इतक्या टोकाच्या पावलावर कशी पोहोचली, हा प्रश्न सर्वत्र चर्चेत आहे. घटनेचा तपास जलदगतीने व निष्पक्षपणे होऊन दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी समाजातील सर्व स्तरातून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.