माणसं वाचता आली पाहिजे
माणसं वाचता आली पाहिजे
समाजाच्या विशाल रंगमंचावर माणसं दररोज नवनवीन रूपं धारण करीत असतात. कोणाचं हास्य खऱ्या आनंदाचं नसतं, तर कोणाचं मौनही खूप काही सांगत असतं. कोणाचं कौतुक मनापासून असतं, तर काहींची स्तुती ही पाठीमागील वैमनस्य लपविणारी एक मुखवटा असतो. म्हणूनच काळ बदलला, परिस्थिती बदलली, नाती बदलली तरी एक गोष्ट मात्र कायम महत्वाची ठरते माणसं वाचण्याची कला.
काही माणसं निसरडी, काही भाबडी, काही कर्तबगार, काही चतुर, काही सरळ व काही कपटी. पण प्रत्येकाची एक वेगळी अंतर्गत दुनिया असते. समाजात काही माणसं ज्या सहजतेने स्वतःला “निर्दोष” चेहऱ्याने सादर करतात, त्या मागील विचारांचे क्षार सहज कधीच कळत नाहीत. समोर अत्यंत सन्मान, आदर, जिव्हाळा दाखवणारी ही माणसं पाठीमागून त्याच व्यक्तीबद्दल टीका, बदनामी, चहाडी, कटकारस्थान रचू लागतात. समाजात असे ‘बहुरूपी गिरगिट’ नेहमीच आढळतात.
परंतु काही माणसं मात्र याउलट असतात समोर जे वाटतं ते स्पष्टपणे सांगणारी. त्यांची भाषा कधीकधी खडूस वाटली, तल्ख वाटली तरी ती खरी असते. अशा लोकांमध्ये खोटेपणा नसतो. म्हणूनच साधा नियम स्पष्ट होतो ज्यांच्या शब्दांमध्ये गोडवा जास्त, त्यांची मनं कडू असण्याची शक्यता अधिक. अशा वेळी प्रश्न निर्माण होतो, आपण माणसं ओळखायची कशी? वाचायची कशी? अभ्यासायचा कसा?
उत्तर एकच—निरीक्षणाची सवय.
ज्यांचं वाचन चांगलं असतं, साहित्यकृती ज्यांना विचार करायला शिकवतात, ज्यांचा अनुभव मोठा असतो, अशांना माणसांचा स्वभाव समजण्यात फारसा त्रास होत नाही. हे लोक शब्दांपेक्षा ‘नजरा’ वाचतात, वागणूक वाचतात, व्यक्तीचा स्वभाव त्याच्या शांततेतूनही शोधू शकतात. कवी, लेखक, पत्रकार, समाजशास्त्री ही माणसं समाजातील व्यवहाराच्या छटा नीट ओळखतात कारण त्यांना प्रत्येक हसू, प्रत्येक मौन, प्रत्येक नजरेच्या मागचा अर्थ जाणवतो.
समाजात पाऊल टाकताना आपण अनेक स्तरांतील, विविध विचारधारेच्या, वेगवेगळ्या उद्देशांच्या लोकांना भेटतो. काहींची मैत्री सोनेरी असते, तर काहींचा सहवास विषारी असतो. काही आपल्याला पुढे नेतात, काही मागे ओढतात. अशावेळी माणसांची ‘अंतर्गत रसायनशास्त्र’ समजून घेणे अत्यावश्यक होते. कारण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला, तर धोका; आणि योग्य माणसाला न समजून दूर केले, तर तोटा. म्हणूनच, माणसं वाचणं ही फक्त एक कला नाही ती अनुभवांनी घडलेली, वेळेने शिकवलेली, मनाने तपासलेली, जीवनाने पडताळलेली एक आवश्यक कौशल्य आहे.
वेळ वाचन शिकवतो, पुस्तकं विचार शिकवतात, आणि समाज माणसं ओळखायला शिकवतो. जो माणूस माणसं वाचायला शिकतो, तो जीवनातील अनेक फसवेगिरी, दिखाऊपणा, आणि अनाठायी भावनांच्या जंजाळातून स्वतःला वाचवू शकतो.
शेवटी एवढंच—
फक्त अक्षरं वाचली, तर शिक्षित होता;
पण माणसं वाचली, तर समजूतदार होता.
राजेंद्र चौधरी.
रोझोदा. ता. रावेर.
मो. ७७००९८२७६५

कोणत्याही टिप्पण्या नाहीत