“परळच्या ऐतिहासिक वास्तूस राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा”-संविधान दिनानिमित्त जोरदार मागणी
“परळच्या ऐतिहासिक वास्तूस राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा”-संविधान दिनानिमित्त जोरदार मागणी
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त मैत्री संस्था, उत्प्रेरक फाउंडेशन, जनहित फाउंडेशन आणि सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने परळ येथील बी. आय. टी. चाळ क्रमांक १ येथे भव्य, उत्साहवर्धक व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात “संविधान जागर कवी संमेलनाने” झाली. या संमेलनात मोहन जाधव, निशाताई जाधव, डॉ. संतोष कांबळे, निखिल मोंडूला आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी प्रभावी कविता सादर केल्या, तर अमर काझी यांनी पोवाड्याद्वारे श्रोत्यांची मनं जिंकली. कवी संमेलनानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख सत्रास सुरुवात झाली.
प्रमुख अतिथी म्हणून शंकर लोखंडे (अध्यक्ष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा समिती), मोहन जाधव (कवी, लेखक व बाबुराव जाधव यांचे चिरंजीव) आणि निशाताई जाधव (माता रमाई यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या) उपस्थित होते. तसेच अनिकेत मनोज संसारे (युवा नेते, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष) यांची विशेष उपस्थिती लाभली. कोषाध्यक्ष विजय पवार, सुमित संसारे व सहकारी; काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष सुशांत दोडमणी हे देखील उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्ष सुरज भोईर (अध्यक्ष : मैत्री संस्था) तर सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी प्रभावीपणे पार पाडले.
कार्यक्रमात अनिकेत मनोज संसारे यांनी आपल्या थेट, जाज्वल्य आणि मनाला भिडणाऱ्या भाषणातून अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांना स्पर्श केला. ते म्हणाले, “ही वास्तू आमच्या समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. इथे बाबासाहेबांच्या अथक संघर्षाची बीजे रोवली गेली. फुले–शाहू–आंबेडकरी चळवळीच्या स्मारकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसते, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. जिथे बाबासाहेब, रमाई व शाहू महाराज एका छताखाली आले— त्या ठिकाणी ‘राष्ट्रीय स्मारक’ दर्जा न मिळणे हा ऐतिहासिक अन्याय आहे. या वास्तूचा प्रेरणादायी इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. मी आणि माझी संपूर्ण टीम या चळवळीस पूरक साथ देत, हजारो तरुणांना येथे आणून जागृती करण्याचे वचन देतो.”
यानंतर कार्यक्रमाची सांगता संविधान सरनामा अभिवाचनाने झाली. वाचनानंतर उपस्थितांनी बाबासाहेब ज्या घरात वास्तव्यास होते त्या पवित्र स्थळी जाऊन विनम्र अभिवादन केले. “राष्ट्रीय स्मारक” दर्जा मिळवण्यासाठी एकत्रितपणे लढण्याचा दृढ संकल्प व्यक्त करताना संपूर्ण वातावरण अधिकच प्रेरणादायी झाले. संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. संतोष कांबळे, मुकुंद कांबळे, अॅड. सोपान बुडबाडकर, विनायक जवळेकर, विकास कदम आणि डॉ. प्रभाकर कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. संविधान दिनाच्या या पवित्र दिवशी परळची ऐतिहासिक वास्तू नवचैतन्याने उजळून निघाली. “राष्ट्रीय स्मारक” दर्जासाठीची मागणी अधिक जोरकस, सुसंघटित आणि प्रभावी पद्धतीने पुढे येत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. अखेरीस “जय भारत… जय संविधान…!” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आणि संविधानप्रेमाचा उत्साह अधिक तेजस्वी झाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत