बातमी: काहूरखेडे जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा
बातमी: काहूरखेडे जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा
लेवाजगत न्युज भुसावळ:- भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहूरखेडे येथे संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवण आणि सुजाण नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रास्ताविकेचे वाचन, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि प्रभात फेरी असे उपक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे मॅडम यांच्या हस्ते संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून झाली. विद्यार्थी मित्रांना संविधानातील हक्क, अधिकार, कर्तव्ये आणि राज्यकारभाराच्या मूलभूत तत्त्वांची माहिती उपशिक्षक समाधान जाधव सर यांनी दिली. संविधानिक मूल्यांचा अंगीकार करून सुजाण नागरिक होण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यानंतर संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. ‘संविधान कोणत्या भाषेत लिहिले आहे?’, ‘मसुदा समितीचे अध्यक्ष कोण?’, ‘संविधान कधी स्वीकारले व कधी लागू झाले?’ अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विजेत्या विद्यार्थ्यांना स्केच पेन, पेन, पेन्सिल, खोडरबर आणि रंगीत खडू देऊन अभिनंदन करण्यात आले.
संविधानातील हक्क व अधिकार या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. आकर्षक चित्रांसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या हातात संविधानाची पुस्तके देऊन गावात प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी संविधानातील हक्क-अधिकारांचे वाचन करून त्याची सखोल माहिती घेतली.
कार्यक्रमात नलिनी पाटील आणि अमोल पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन उपशिक्षिका उज्वला सुरवाडे मॅडम यांनी केले.
संविधान दिनाचा हा उपक्रम शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत