कवितांच्या झोतात उजळला विज्ञानविचाराचा दीप
कवितांच्या झोतात उजळला विज्ञानविचाराचा दीप
महाअनिस नवी मुंबई शाखेच्या कवी संमेलनाला राज्यभरातून उस्फूर्त प्रतिसाद
नवी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाअनिस नवी मुंबई जिल्हा आयोजित कवी संमेलन उत्साहाच्या, विविधतेच्या आणि विचारप्रकाशाच्या दिमाखात संपन्न झाले. अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन या महत्त्वपूर्ण विषयांवर आधारित हे संमेलन ज्ञान विकास विद्यालय, कोपरखैरणे येथे रंगले. राज्यभरातील कवींचा मोठा सहभाग लाभल्याने हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने राज्यस्तरीय कवी मेळावा ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधव बावगे तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड. खरगे, सार्थक सपकाळ, उपसंपादक राजेंद्र घरत, दत्ता आव्हाड, पत्रकार प्रथमेश गडकरी आणि आरती नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अशोक निकम यांनी पाण्यावर दिवा पेटवून दाखवलेल्या प्रभावी प्रयोगाने झाली—वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रकाश प्रत्यक्षात अनुभवायला लावणारा हा क्षण उपस्थितांना थक्क करून गेला.
प्रास्ताविक राजेंद्र पंडित यांनी केले. निवेदन प्रदीप कासुर्डे यांनी त्यांच्या ओजस्वी शैलीत रंगतदारपणे केले. त्यानंतर काव्यरत्नांची ओघवती मैफल रंगत गेली. विचारांची धार, भावना, सत्य-असत्याच्या चौकटी मोडून काढणारी भाषाशक्ती आणि माणुसकीचा शुद्ध नाद यांनी सभागृह भारावून गेले.
या कवीसंमेलनात डॉ. शैलजा करोडे, स्मिता तोरसकर, किशोरी पाटील, कल्पना म्हापुसकर, कल्पना देशमुख, नम्रता कांबळे, प्रिया कदम, निर्मला माने, सुरेखा पगारे, पल्लवी बांदोडकर, अरुण घोडेराव, डॉ. हरिभाऊ रणबावळे, मुरलीधर रणखांब, राहुल इंगोले, डॉ. सुभाष कटकधोंड, एकनाथ शेडगे, प्रल्हाद कसबेकर, गुरुदत्त वाकदेकर, अशोक सुकाळे, गिरीश भट, सुरेश लोहार, विनोद बांदोडकर, लिलाधर महाजन, अशोक भवार, दत्तू नाईकवाडे, अशोक नागकिर्ती, रुपचंद शिदोरे, विलास आडसुळे, महेंद्र पाटेकर, मंगेश रेडीज आणि नवनाथ घाडगे यांनी आपल्या काव्यकुंचल्यांनी विचारज्योतींना उजाळा दिला.
सर्व कवींनी सादर केलेल्या कवितांचे संकलन करून ‘काव्यज्योत’ या सुंदर ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले असून त्याचे संपादन कार्य प्रदीप कासुर्डे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. प्रत्येक कवीला सन्मानपत्र आणि शब्दगुच्छ अर्थात पुस्तक देऊन गौरवण्यात आले—शब्दशक्तीला व विचारप्रबोधनाला दिलेला मान त्यातून जाणवून गेला.
या कार्यक्रमात नवी मुंबई जिल्ह्यातील कार्यकर्ते पी. ए. पठारे, गजानन जाधव, उत्तम रोकडे, दिपरत्न सुरडकर, निवास पडळकर, निरंजन थोरात, सीमा सुरडकर, सीमा कांबळे, किरण वाळुंज आणि पवन कोकाटे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
शेवटी ‘हम होंगे कामयाब’ या प्रेरणादायी गीताने या ज्ञानयज्ञाची सांगता झाली—आशेचा दिवा, विवेकाची ज्योत आणि कवितेचा सुगंध मनात रुजवून. या गीताने उपस्थितांना एका मुक संकल्पाची जाणीव करून दिली—विवेकाची चळवळ अधिक बळकट करण्याची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवण्याची.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत