Contact Banner

दिपनगर औष्णिक केंद्रातील अधिक्षक अभियंता लाचप्रकरणात अडचणीत

 

अँटी करप्शनची धडक कारवाई: दिपनगर औष्णिक केंद्रातील अधिकारी लाच

दिपनगर औष्णिक केंद्रातील अधिक्षक अभियंता लाचप्रकरणात अडचणीत


लेवाजगत न्यूज भुसावळ:- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील (२१० मेगावॉट) अधिक्षक अभियंता भानुदास पुंडलीक लाडवंजारी (वय ५७, रा. नेहरू नगर, जळगाव) यांनी एका खाजगी कंपनीच्या २,२८,५४४ रुपये किंमतीच्या बिलाच्या मंजुरीसाठी ५ टक्के म्हणजे ११,४२७ रुपये लाच मागितल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तडजोडीनंतर ही रक्कम ५,००० रुपयांवर ठरली होती; मात्र तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे लेखी तक्रार दिली. तक्रारदाराच्या खाजगी कंपनीला २८ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दिपनगर पॉवर प्लांट परिसरातील तळाशी साचलेली राख उचलणे, मोडतोड करणे, तेलाच्या बॅरल्स काढणे व वाहतूक करण्याचे कंत्राट मिळाले होते. 

 या कामासाठीचे बिल मंजुरीसाठी मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यात आले असताना बिल मंजूर करण्याच्या बदल्यात अधिक्षक अभियंता लाडवंजारी यांनी लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

      तक्रारीची पडताळणी करताना आरोपी अधिकाऱ्याने पुन्हा ५,००० रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा कारवाई सुरू असून, लवकरच अटक होणार असल्याची माहिती विभागाने दिली. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून तर पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. पंच म्हणून किशोर महाजन तर पथकात पो.ना. बाळू मराठे, पो.शि. अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकूर व भूषण पाटील (ला.प्र.वि. जळगाव) यांचा समावेश होता. या कारवाईस नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले. 

   दिपनगरसारख्या महत्त्वाच्या सरकारी प्रकल्पात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच अशाप्रकारे लाच मागितल्याचे समोर आल्याने खाजगी कंत्राटदारांमध्ये संतापाची लाट असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.