Contact Banner

सावद्यात सायं. ५.३० वाजता बारागाड्या ओढणार; पवार घराण्याकडे मान कायम चंपाषष्ठीनिमित्त सावद्यात उत्साहात खंडोबा यात्रा; नवरत्न, तळी भरणे, पाच फेऱ्यांचा आकर्षक विधी


 सावद्यात सायं. ५.३० वाजता बारागाड्या ओढणार; पवार घराण्याकडे मान कायम
चंपाषष्ठीनिमित्त सावद्यात उत्साहात खंडोबा यात्रा; नवरत्न, तळी भरणे, पाच फेऱ्यांचा आकर्षक विधी


 लेवाजगत न्यूज प्रतिनिधी | सावदा-चंपाषष्ठीनिमित्त सावदा शहरात खंडेराव महाराजांचा शतकानुशतकांची परंपरा लाभलेला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या धार्मिक कार्यक्रमांना चंपाषष्ठीच्या दिवशी विशेष गर्दी आणि उत्साह लाभतो.

     सकाळी तळी भरण्याचा कार्यक्रम – भक्तांचा मोठा सहभाग

    चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी काकडा आरतीनंतर दहा वाजता तळी भरण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने देव देवतांचे भंडाऱ्याने पूजन व आरती केली जातो. वांग्याचे भरीत, बाजरीची भाकर व बट्टी (रोडगा) यांचा नैवेद्य दाखवून श्वानास नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जाते.

    दुपारी तीन वाजता नवरत्न सह ग्रामप्रदक्षिणा

दुपारी ३ वाजता ‘नवरत्न’ सह ग्रामप्रदक्षिणा निघते. या मिरवणुकीत राहुल भगत आणि अशोक भगत यांचा परंपरेनुसार सहभाग असतो. डफ वाद्यासह मिरवणूक शहरातून निघते व वातावरण भक्तिमय होते. यावेळी संपूर्ण गावात भंडाऱ्याची उधळण होते.

    संध्याकाळी पाच वाजता पाच प्रकारचे पूजन

    संध्याकाळी ५ वाजता बारा गाड्यांना पाच प्रकारचे पूजन करून ‘छापे मारण्याचा’ विधी पार पडतो. पूजनानंतर मंदिरातून वाजतगाजत ‘नवरत’ बाहेर पडतो, त्यानंतर भाविकांच्या जयघोषात बारा गाड्यांना पाच फेऱ्या मारल्या जातात.


    बारा गाड्या ओढण्याचा शतकानुशतकांचा विधी

पाच फेऱ्यांनंतर उत्सवाचा मुख्य सोहळा सुरू होतो — बारा गाड्या ओढण्याचा विधी. भाविकांच्या सहभागाने आणि खंडोबा महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात या गाड्या ओढल्या जातात. यानंतर या गाड्यांचे ‘ओडणे’ आठवडे बाजारात केले जाते.


 ५१ गाड्या,२४ गाड्या व  जळत्या अंगारांवरून गाड्या ओढण्याची जुनी परंपरा

सावदा येथील चंपाषष्ठी उत्सवाची एक आगळी–वेगळी ओळख म्हणजे येथे पूर्वीपासून ५१,२४ गाड्या आणि जळत्या अंगारांवरून जात गाड्या ओढण्याची परंपरा होती. या अनोख्या आणि ऐतिहासिक परंपरेमुळे येथे आसपासच्या गावांतील भाविकसुद्धा मोठ्या संख्येने येतात आणि मान देण्यासाठी उपस्थित राहतात.

   पवार घराण्याला मान कायम – ३०० वर्षांची अखंड परंपरा

      गेल्या ३०० वर्षांपासून बारा गाड्या ओढण्याचा मान पवार कुटुंबीयांकडे आहे. चौथी व पाचवी पिढी आजही ही परंपरा जपते. सध्या अशोक वसंत पवार आणि राहुल अशोक पवार हा मान सांभाळत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.