Contact Banner

अतिवृष्टीने बोदवड तालुका हादरला; आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली हानीग्रस्त भागांची पाहणी

 

chandrakant-patil-visited-heavy-rain-affected-bodwad-taluka

अतिवृष्टीने बोदवड तालुका हादरला; आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली हानीग्रस्त भागांची पाहणी

लेवा जगत न्यूज  बोदवड- तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून, अनेक ठिकाणी पिके, जनावरे आणि घरांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

जामठी, येवती, लोणवळी, धोनखेडा, कुऱ्हा-हरदो, मनुर आणि शेवगा या गावांमध्ये पावसाने थैमान घातले. शेतमाल पाण्याखाली गेला, भात, कापूस, मका, सोयाबीन यांसारखी हंगामी पिके पूर्णपणे नष्ट झाली. काही भागात ओढ्यांना पूर आल्याने घरांमध्ये पाणी शिरले आणि जनजीवन विस्कळीत झाले.

या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी रविवारी सकाळी हानीग्रस्त भागांना भेट देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि प्रशासनाला त्वरित पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना तातडीची मदत देण्याचे आदेश दिले.

आमदार पाटील म्हणाले,

“निसर्गाच्या या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांवर मोठे ओझे आले आहे. शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल. कोणत्याही शेतकऱ्याला किंवा नागरिकाला वंचित ठेवले जाणार नाही.”

त्यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, तसेच प्रभावित गावांतील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने प्राथमिक पंचनाम्याचे काम सुरू केले असून नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी प्रयत्न गतीमान करण्यात आले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.