फैजपूर येथे चंपाषष्टी निमित्त सामूहिक मल्हारी सप्तशती पठण व हवनाचा धार्मिक सोहळा
फैजपूर येथे चंपाषष्टी निमित्त सामूहिक मल्हारी सप्तशती पठण व हवनाचा धार्मिक सोहळा
लेवाजगत फैजपूर, ता. यावल :- मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी या पवित्र कालावधीत कुलदैवतांची श्रेष्ठ सेवा करण्याची परंपरा जपत, यंदाही चंपाषष्टी निमित्त फैजपूर येथील जागृत श्री खंडेराव महाराज मंदिरात सामूहिक मल्हारी सप्तशती पठण, हवन आणि तळी भरणे सोहळा मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे. या दिव्य उपक्रमाचे आयोजन खंडोबा देवस्थान संस्थान व श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, रावेर–यावल परिसराच्या वतीने करण्यात आले असून भाविकांमध्ये उत्सुकता आणि श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दि. २६ नोव्हेंबर २०२५, बुधवार, सकाळी १० वाजता खंडेराव वाडी येथील श्री खंडेराव महाराज मंदिरात या सामुदायिक सेवेला मंगल प्रारंभ होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतील, असा आयोजकांना विश्वास आहे. चंपाषष्टीच्या दिवशी जागृत स्थळी होणारे मल्हारी सप्तशती पठण व हवन हे अत्यंत पुण्यप्रद मानले जाते.
पूर्वजांच्या सत्कर्मावर प्रसन्न होऊन शिव–पार्वती यांनी कुलदेवतांच्या रूपात कुलाचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारल्याची भावना या सोहळ्यातून दृढ होते. मार्गशीर्ष महिन्यात विशेषतः श्री मार्तंड भैरवांची कृपा लाभते, अशी श्रद्धा असून मल्हारी सप्तशती पठणामुळे घरातील मतभेद दूर होणे, ताणतणाव कमी होणे, अडथळे दूर होणे, मुलांच्या शिक्षण–नोकरी–विवाहातील अडचणी कमी होणे, तसेच कुलशापांचे निवारण व पितरांच्या कृपेची प्राप्ती असे अनेक लाभ मिळतात, असे धार्मिक जाणकार सांगतात.
सामूहिक सेवेसाठी महिलांनी पिवळी साडी व पुरुषांनी पिवळा पोशाख परिधान करावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. सोबत आणावयाच्या साहित्यामध्ये — मल्हारी सप्तशती ग्रंथ, नित्यसेवा साहित्य, आसन, जपमाळ, हळद–भंडारा (१२५ ग्रॅम), खोबरे, पिवळी फुले, १०८ बेलपत्र, तांदूळ (१२५ ग्रॅम) आणि नैवेद्यासाठी बाजरीची भाकर व वांग्याचे भरीत — यांचा समावेश आहे.
कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून अधिकाधिक भक्तांनी या सामूहिक दिव्य सेवेला उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन फैजपूर येथील खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज,महामंडलेश्वर पवनदास महाराज वश्री स्वामी समर्थ भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत