Contact Banner

पत्नी बेपत्ता दाखवणाऱ्या पतीकडूनच तिचा खून; मृतदेह भट्टीत जाळून पुरावे नष्ट -वारजेतील धक्कादायक

husband-kills-missing-wife-burns-body-in-furnace-warje-pune-shocking-case


पत्नी बेपत्ता दाखवणाऱ्या पतीकडूनच तिचा खून; मृतदेह भट्टीत जाळून पुरावे नष्ट -वारजेतील धक्कादायक 


वृत्तसंस्था पुणे –पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून तिचा पाठपुरावा करणाऱ्या पतीनेच तिचा खून करून मृतदेह भट्टीत नष्ट केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. वारजे पोलिसांनी कौशल्याने तपास करत या खुनाचा छडा लावला असून, एका गॅरेजचालकाला अटक केली आहे.


Sadguru


समीर पंजाबराव जाधव (वय ४२, रा. शिवणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याची पत्नी अंजली जाधव (वय ४०) हिचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक तपासात अनैतिक संबंधांच्या कारणावरून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपी समीर याचे वारजे परिसरात गॅरेज आहे. तो पत्नी अंजलीसोबत त्याच परिसरात राहत होता. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी त्याने वारजे पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदवली होती आणि त्यानंतर सतत पोलिस ठाण्यात जाऊन पाठपुरावा करत होता. पोलिसांनी मात्र या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला.

अंजली बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. चौकशीत समीरच्या माहितीत विसंगती आढळल्याने पोलिसांनी संशय घेतला. शेवटी कसून चौकशीनंतर समीरने स्वतःच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.

तपासात उघड झाले की, अंजलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ही बाब लक्षात आल्यानंतर समीरने अंजलीला हे संबंध तोडण्यास सांगितले, मात्र तिने नकार दिल्याने वारंवार वाद होत होते. शेवटी समीरने खून करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी त्याने वारूळवाडी परिसरात पत्र्याची शेड भाड्याने घेतली आणि तेथे लोखंडी बॉक्स व जळणाची लाकडे ठेवली. २६ ऑक्टोबर रोजी फिरायला नेण्याच्या बहाण्याने अंजलीला शेडमध्ये नेऊन तिचा गळा दाबून खून केला. नंतर बॉक्समध्ये मृतदेह ठेवून जाळून टाकला आणि राख नदीत सोडली. त्याने नंतर स्वतःच बेपत्ता तक्रार दाखल केली होती.

वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशवनाथ काईंगडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे, पोलिस निरीक्षक नीलेश बडाख, पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलिस उपनिरीक्षक नितीन गायकवाड व त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.