मुंबईत रेल्वे अपघात — अंबरनाथ फास्ट लोकलने चार प्रवाशांना धडक दिली!
मुंबईत रेल्वे अपघात — अंबरनाथ फास्ट लोकलने चार प्रवाशांना धडक दिली!
सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ रेल्वे आंदोलनामुळे प्रवासी रुळावर; चार जण जखमी — तीन महिला, एक पुरुष
लेवाजगत न्यूज मुंबई (प्रतिनिधी):मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर आज दुपारी भीषण अपघात झाला आहे. सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ अंबरनाथ फास्ट लोकलने रुळावरून चालणाऱ्या चार प्रवाशांना धडक दिली. या अपघातात तीन महिला आणि एक पुरुष जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
हा अपघात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. आंदोलनामुळे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. त्यामुळे काही प्रवासी रुळावरून चालत होते, त्याचवेळी ही दुर्घटना घडली.
जखमींना तातडीने जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
रेल्वे प्रवासी संघटनेचे सिद्धेश देसाई यांची प्रतिक्रिया
“पिक अवरमध्ये ट्रेन लेट झाल्या की प्रचंड गर्दी होते. मुंब्रा येथील अपघातानंतर सखोल तपास करणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही. आता पुन्हा प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत.
CRMS ने आंदोलन अचानकपणे केल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत,”
असे रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते सिद्धेश देसाई यांनी सांगितले.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले —
“सँडहर्स्ट रोड स्टेशनवर काही प्रवासी रुळावरून चालले होते. त्यावेळी अंबरनाथ फास्ट ट्रेनने धडक दिली. तिघांना धडक लागल्याची माहिती मिळाली आहे. सर्व जखमींना तातडीने वैद्यकीय मदत पुरवली जात आहे,”
असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
अचानक आंदोलनामुळे वेळापत्रक कोलमडले
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी आज दुपारी अचानक आंदोलन पुकारल्याने संपूर्ण मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले.
लोकल ट्रेन उशिरा धावत असल्याने CSMT, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली.
संध्याकाळच्या चाकरमान्यांच्या वेळेत या उशिरामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.
सध्या मध्य रेल्वेवरील गाड्या २५ ते ३५ मिनिटे उशिराने धावत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत