‘हाताला सलाइन, पेन आणि लेख’ — रुग्णालयातूनही संजय राऊतांची लेखणी सुरू! मुलुंड फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू; सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो चर्चेत
‘हाताला सलाइन, पेन आणि लेख’ — रुग्णालयातूनही संजय राऊतांची लेखणी सुरू!
मुलुंड फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू; सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो चर्चेत
मुंबई (प्रतिनिधी):शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याने त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे निष्पन्न झाल्याने डॉक्टरांनी काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
याबाबत माहिती त्यांच्या बंधू, आमदार सुनील राऊत यांनी दिली. सध्या संजय राऊत यांची प्रकृती स्थिर असून, पुढील पाच दिवस ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी ‘एक्स’ (Twitter) वर पत्र पोस्ट करून प्रकृती बिघडल्याची माहिती दिली होती. “काही महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहे,” असे त्यांनी त्या पत्रात म्हटले होते.
मात्र आता, रुग्णालयातील खाटेवरून लिहितानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये राऊत यांच्या हाताला सलाइनची सुई लावलेली असून, त्याच हाताने ते पानभर लेख लिहिताना दिसत आहेत. सामना दैनिकासाठी त्यांनी लेख लिहिला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्या पोस्टला त्यांनी दिलेले कॅप्शन चर्चेत आले आहे —
> “हात लिहिता राहिला पाहिजे... कसेल त्याची जमीन, लिहिल त्याचे वृत्तपत्र — आमच्या पिढीचा मंत्र होता!”
दरम्यान, या पोस्टखाली संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त करणाऱ्या अनेक कमेंट्स आल्या आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आराम करण्याचे आवाहन केले असून, “ते लवकर बरे व्हावेत” अशी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत