राष्ट्रीय स्तरावर कु. साक्षी कुलकर्णीचा विजय! थर्ड ऑल इंडिया कल्चरल ऑलिम्पियाड कॉन्टेस्ट 2025 मध्ये सेमी क्लासिकल नृत्यात प्रथम क्रमांक
राष्ट्रीय स्तरावर कु. साक्षी कुलकर्णीचा विजय!
थर्ड ऑल इंडिया कल्चरल ऑलिम्पियाड कॉन्टेस्ट 2025 मध्ये सेमी क्लासिकल नृत्यात प्रथम क्रमांक
सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी):स्वरमयी नृत्य निकेतन, पुणे यांच्या तर्फे आयोजित आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या मान्यतेने पार पडलेल्या नृत्यमहोत्सव 2025 या भव्य सांस्कृतिक स्पर्धेत कु. साक्षी कुलकर्णी हिने चमकदार यश संपादन करत राष्ट्रीय स्तरावर आपले नृत्यकौशल्य सिद्ध केले आहे.
दिनांक १ आणि २ नोव्हेंबर २०२५ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम, पुणे येथे झालेल्या या थर्ड ऑल इंडिया कल्चरल ऑलिम्पियाड कॉन्टेस्ट–२०२५ मध्ये देशभरातील विविध राज्यांतील 300 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत भरतनाट्यम, कथक, सेमी क्लासिकल आणि लोकनृत्य असे विविध नृत्यप्रकार समाविष्ट होते. यामध्ये सेमी क्लासिकल नृत्य प्रकारात कु. साक्षी कुलकर्णी हिने प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तरावर विजेतेपदाचा मान मिळवला.
कु. साक्षी ही आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, डी. एस. शिरपूर येथे शिक्षण घेत असून, तिला नूपूर कथक अकादमीच्या संचालिका तथा गुरु सौ. चारू भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या स्पर्धेचे आयोजन स्वरमयी गोडबोले व सहकारी यांनी केले होते. साक्षीच्या या यशामुळे शिरपूर व धुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“नृत्य ही केवळ कला नसून ती साधना आहे. हा पुरस्कार माझ्या गुरुंच्या आणि पालकांच्या आशीर्वादानेच शक्य झाला,” अशी नम्र प्रतिक्रिया कु. साक्षीने दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत