रोझोदा गावातील शेतकरी कुटुंबातील कन्या डाळिंबी सरोदे राज्य सेवेत झळकली — OBC प्रवर्गातून राज्यात १६ वा क्रमांक, गावाचा अभिमान वाढवला!
रोझोदा गावातील शेतकरी कुटुंबातील कन्या डाळिंबी सरोदे राज्य सेवेत झळकली — OBC प्रवर्गातून राज्यात १६ वा क्रमांक, गावाचा अभिमान वाढवला!
लेवा जगत न्यूज प्रतिनिधी सावदा-रावेर तालुक्यातील रोझोदा गावातील शेतकरी कुटुंबातील कन्या डाळिंबी रवींद्र सरोदे हिने महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा – २०२४ मध्ये उल्लेखनीय यश मिळवत OBC प्रवर्गातून राज्यात १६ वा क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशामुळे रोझोदा गावासह संपूर्ण रावेर तालुक्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डाळिंबी सरोदे ही एका शेतकरी पार्श्वभूमीच्या एकत्रित कुटुंबातील कन्या असून, तिचे आई-वडील शेती व्यवसायात कार्यरत आहेत. अशा ग्रामीण व साध्या कुटुंबातून येऊन तिने OBC प्रवर्गातून राज्यात सोळावा क्रमांक मिळवला आहे, ज्यामुळे गावकऱ्यांसह आप्तेष्ट आणि मित्रपरिवारातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या डाळिंबी सरोदे रावेर तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असून, वयाच्या केवळ २६व्या वर्षी तिने राज्यसेवेची प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिच्या चिकाटी, परिश्रम आणि ध्येयनिष्ठेच्या जोरावर साध्य केलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
गावकऱ्यांनी डाळिंबीच्या या यशाबद्दल उत्स्फूर्त आनंद व्यक्त केला. “ही आमच्या गावाची अभिमानास्पद कन्या आहे. तिने दाखवून दिले की ग्रामीण भागातील विद्यार्थीही कठोर परिश्रमाने मोठे यश मिळवू शकतात,” अशा भावना परिसरातून व्यक्त होत आहेत.
आपल्या यशाबद्दल बोलताना डाळिंबी सरोदे म्हणाली, “नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास हेच माझ्या यशामागचे गुपित आहे. माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद, कुटुंबाचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळेच हे स्वप्न साकार झाले.”


.jpg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत